लोणावळा : सततच्या अपघाती घटनांनी मृत्यूचा सापळा बनलेल्या ऐतिहासिक अमृतांजन पुलाला अखेर सोमवारी सुरक्षा जाळी बसविण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे स्टंट करण्यावर चाप बसणार आहे़ वारंवार या ठिकाणी अपघात घडत होते़ मागील दोन वर्षांत चार अपघातांमध्ये चार युवक ठार, तर चार जण जायबंद झाले होते़ यासह किरकोळ घटना वारंवार या ठिकाणी घडत होत्या़ हा पूल अमृतांजन नव्हे, तर अपघाती पूल म्हणून प्रसिद्ध होत असल्याने या ठिकाणी रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ‘लोकमत’ने संबंधित यंत्रणांसह पोलीस प्रशासन व तहसीलदारांकडे लावून धरली होती़ याची दखल घेत मागील तीन दिवसांपासून कंपनीने या ठिकाणी जाळी बसविण्याचे काम सुरू केले होते़ ते सोमवारी पूर्ण झाले़पुणे जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून या पुलाची ओळख आहे़ हा पूल केवळ यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे मृत्यूचा सापळा बनला होता़ द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीच्या काळात राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलाला समांतर मोठा दुसरा पूल उभारण्यात आला होता़ मात्र, हे करत असताना दोन्ही पुलांच्या मध्ये साधारण चार ते पाच फु टांचे अंतर ठेवण्यात आले होते़ ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती़ (वार्ताहर)
अमृतांजन पुलाला सुरक्षा जाळी
By admin | Published: June 30, 2015 12:09 AM