वानवडी: एका उच्चभ्रू सोसायटीमधील जलतरण तलावात बुडून ज्येष्ठ नागरिकाचामृत्यू झाल्याची घटना वानवडीत बुधवारी (दि. ५) घडली. सूचित घास (वय ८५, रा. वानवडी) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटीमधील जलतरण तलावात सकाळी आठच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या इमारतीमधील एका मुलीला पाण्यात कोणीतरी बुडाले असल्याचे आढळले. त्वरित सुरक्षारक्षक व तेथील रहिवाशांना कळविण्या आले. रहिवाशांनी तातडीने ज्येष्ठ व्यक्तीला बाहेर काढत वानवडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले.
दवाखान्यात दाखल केल्यावर सूचित घास यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, असे येथील रहिवाशांनी सांगितले. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी कोणताही जीवरक्षक उपस्थित नव्हता आणि जलतरण तलाव परिसरात सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा नाही. वृद्ध व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला की बुडून मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन तपासणीद्वारे स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी सांगितले, रुबी हॉलमधून एमएलसी रिपोर्ट आला आहे. ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सूचित घास हे पोहताना जलतरण तलावात बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.