पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळार्फे घेतली जात असलेली इयत्ता दहावीचीपरीक्षा संपली असून विद्यार्थ्यांनी पेपर संपल्यानंतर शेवटच्या दिवशी जल्लोष केला. परीक्षा संपली असली तरी आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. करोनामुळे दोन वर्षे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला होता. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द झाला होता. त्यामुळे या वर्षी भूगोल विषयाचा पेपर कसा असणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मात्र,शेवटचा पेपर खूपच सोपा गेल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
या वर्षी राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे पेपर सुटल्यानंतर सर्व वर्ग मित्र शाळांच्या बाहेर गटागटाने जमून गप्पा मारत दंग असल्याचे दिसून आले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणीसोबत आवडत्या खाद्य पदार्थावर ताव मारला. तसेच दोन वर्षे कोरोनामुळे घराबाहेर पडणे शक्य न झाल्याने अनेकांनी बाहेरगावी सुट्टीला जाण्याचे नियोजन आपल्या मित्रांना सांगितले.