पुणे :चाकण ग्रामीण रुग्णालयाची ३० खाटांवरून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणी वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी आम्ही स्वत: पाठपुरावा केला होता. मात्र, हे काम माजी खासदार शिवाजीराव आढळराव आपण मंजूर केल्याचे सांगत आहेत. वास्तविक हे धादांत खोटे व दिशाभूल करणारे असल्याचे दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले.
याबाबत आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, चाकण ग्रामीण रुग्णालयाची ३० खाटांवरून १०० खाटांपर्यंत मर्यादा वाढवून उपजिल्हा रुग्णालयाला श्रेणी वाढ मंजुरी देण्याकामी मी व विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. विशेष म्हणजे हे कागदोपत्री समोरासमोर बसून आपण सिद्ध करण्यास तयार आहे व तशी भूमिका आढळराव यांनीदेखील घ्यावी. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे. या कामाचा मी २०२०पासून सातत्याने पाठपुरावा करतो आहे.
तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार तसेच संबंधित अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार व प्रस्ताव सादर केला. चाकण येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून श्रेणी वाढ होण्यासाठी यशस्वी प्रयत्न केलेले आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर त्यात योग्य त्या सुधारणा केल्या आणि अंतिम सहीसाठी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे तो प्रलंबित असताना आमचे सरकार गेले आणि तो विषय प्रलंबितच राहिला.
दरम्यान, १६ ऑगस्टला संबंधित खात्याचे आरोग्य मंत्री व अधिकारी यांना पत्रव्यवहार करून चाकण ग्रामीण रुग्णालय येथील ३० खाटांवरून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणी वाढ करण्याचे काम मंजूर करण्याची विनंती केली होती. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून ते काम मंजूर केले. परंतु, आढळरावांचे म्हणजे ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशी त्यांची अवस्था असल्याने लगेच त्यांनी कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे की, या कामाचा आपण केलेला पत्रव्यवहार दाखवा आणि मग श्रेय घ्या. त्यांची खासदारकीची १५ वर्षे निष्क्रियतेची गेली आहे. एक चांगलं काम त्यांनी माझ्या खेड तालुक्यात दिलेलं नाही. परंतु, आम्ही मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत असल्याचे आमदार मोहिते-पाटील यांनी सांगितले.
या कामासंदर्भात कुठलाही पाठपुरावा आढळरावांनी केलेला नाही. सन २०२०पासून ते आजपर्यंत वेळोवेळी संबंधित खात्याशी पत्रव्यवहार करून आम्ही ते काम मंजूर केले आहे. कागदपत्रांसहित याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे आढळरावांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून यापुढेही चाकण शहरातील व त्या भागातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सोयी-सुविधा देण्याचे काम करणार आहे.
- दिलीप मोहिते-पाटील, आमदार