'शासन आपल्या दारी' योजनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:27 PM2023-08-07T16:27:31+5:302023-08-07T16:36:02+5:30
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते....
पुणे : 'शासन आपल्या दारी' योजनेमुळे आता सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सध्या सर्वसामान्यांचे सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत. यासाठी सर्व विभागातील अधिकारीही मनापासून काम करत आहेत. आता दाखल्यापासून लाभापर्यंत सर्व मिळत आहे. आतापर्यंत दीड कोटी लोकांनी शासन आपल्या दारी योजनेचा फायदा घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यातील ग्रामपंचायतींनाही सक्षम केले जाईल. जेजुरीसाठी ३५९ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये सर्वांना एका छताखाली आणून त्यांची कामे केली जात आहे. राज्यातील सात ते आठ कोटी नागरिकांना आम्ही योजनेचा लाभ पुरवणार आहे.
"आम्ही मिळून काम करणार"-
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढे जात आहे. राज्यातील बसस्थानके स्वच्छ आणि चांगली होतील यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या राज्यात कुठलाही विरोधक खालच्या पातळीवर टीका करतात, त्यांच्याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही सर्व कामे दोन वर्षांत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. यापूर्वी चंद्रकांत पाटील काम करत होते. आता मी आणि दिलीप वळसे पाटील आणि चंद्रकांत पाटील मिळून काम करणार आहोत.
हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही-
जे कंत्राटदार चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. पण जे कामात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे सरकार पहिले दोन इंजिनच होते, आता त्यात आमचं एक इंजिन जोडलं गेल्याने हे तीन इंजिनच सरकार उत्तम काम करेल, असंही पवार म्हणाले.