मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बुधवारी सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर आयोजित व्याख्यानात तरुण पिढीला राजकारणात येण्याचं आवाहन केलं. राजकारण वाईट नसून ते नासवलं जात आहे. सध्या राजकारणाला फाटे फुटत आहेत. आयुष्यात काहीही घडत नाही म्हणून राजकारणात यायचं असं चित्र सध्या झालं आहे. ते बदलणं तुमच्याच हातात आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केलं. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत?, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंना व्याख्यानासाठी उपस्थित असणाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. यामध्ये उपस्थित असणाऱ्या एका प्रेक्षकाने सांगितले की, तुम्ही काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्याचा विषय हातात घेतला होता. तो तुम्ही लावून धरला पाहिजे. पुणेकरांना भोंग्याचा खूप त्रास सहन करायला लागतोय. तसेच गणेशोत्सवातही आवाजाची पाळली पाहिजे. तुम्ही ध्वनिप्रदुषणचा प्रश्न लावून धरा..साहेब तुमचे मुख्यमंत्री आहेत, असंही प्रेक्षक म्हणाला. प्रेक्षकाच्या या विधानावर राज ठाकरेही त्याला एकटक बघायला लागले. त्यानंतर माफ करा, तुमचे मुख्यमंत्री म्हणजे, तुमच्या फेव्हरचे मुख्यमंत्री आहेत, असं प्रेक्षक म्हणाला. यानंतर राज ठाकरेंनेही डोक्याला हात लावला आणि उपस्थितांमध्ये एकच हसा पिकला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी राजकारणाचा सध्या विचका झाला असून सध्याची तरुणाई राजकारणाला तुच्छ मानू लागली आहे. पण प्रत्येकाचं आयुष्य हे राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे. तुम्हाला सकाळी उठल्यापासून लागणारं दूध, पाणी, पेपर किंवा इतर सर्व सुखसोयी राजकारणी आणि प्रशासन ठरवत असतं. मग राजकारण तुमच्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नव्या पिढीनं राजकारणात येणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच राज्याच्या विधानसभेत सध्या सुरू असलेला गदारोळ आणि भाषणांवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. "विधानसभेतील भाषणं आता ऐकवतच नाहीत. त्यांनी बाहेरही येऊ नये असं वाटतं. कारण ते बाहेर आल्यानंतरही प्रसारमाध्यमांसमोर काहीही बरळतात", असं राज ठाकरे म्हणाले.
"मी त्यांना राजकारणात आणणारच..."
राज ठाकरे यांनी यावेळी समाजकारणाला राजकारणाची धार हवी असते त्याशिवाय बदल घडत नाही हे पटवून देताना राज्यातील तरुण शेतकऱ्यांना राजकारणात आणणारच असं विधान केलं. "राज्यात अनेक तरुण उत्तम काम करत आहेत. नवनव्या गोष्टी शोधून काढत आहेत. माझी भेट घेऊन प्रेझंटेशन देत असतात. अनेक जण शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी काम करत आहेत. शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी काम करणाऱ्या तरुणांना मला राजकारणात आणायचं आहे. मी त्यांना राजकारणात आणणारच", असं राज ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"