बारामती (पुणे) : फुकट अंडी न दिल्याच्या कारणावरून अंडा भुर्जी विक्रेत्याचा मारहाण करून खून केल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी शहरातील टि सी कॉलेज रस्त्यावर अंडा भुर्जी विक्री करणारा शाहबाज रौफ पठाण (वय ३२ वर्षे रा. सद्गुरु नगर पाटस रोड ता. बारामती) हा रात्रीच्या वेळी अंडा भुर्जी गाडी लावून विक्री करीत होता. त्याला अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने गंभीर जखमी केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करणेत आला होता. जखमीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना रविवारी ( ८ ऑक्टोबर )त्याचा म्रुत्यु झाला होता.
पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी गुन्हा दाखल झाल्या नंतर यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी ४ पोलीस पथक तयार केले होते. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार दशरथ इंगोले व अक्षय सिताप यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गुन्हा घडले ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी शहाबाज पठाण यास दारूचे नशेत फुकट अंडी देण्याबाबत एकाने वाद घातल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे माहिती काढून प्रवीण भानुदास मोरे (वय ३६ रा. कल्याणी नगर तांदुळवाडी ता. बारामती) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने बारामती शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
व्यावसायिक तसेच इतर लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांबाबत माहिती असल्यास, तत्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. किंवा ११२ या आपत्कालीन नंबरवर माहिती द्यावी ,असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केले आहे.