मंचर: दुचाकीवरून कामावर निघालेल्या तरुणाच्या डोक्यात व छातीवर विजेचा खांब पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाठीमागे बसलेला तरुण जखमी झाला आहे. ही घटना साकोरे (ता. आंबेगाव) येथे आज सकाळी घडली. विशाल संतोष ढगे (वय 23 रा. साकोरे) असे या तरुणाचे नाव आहे. मागे बसलेला अजित साहेबराव मोढवे हा जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.
साकोरे येथील विशाल संतोष ढगे व अजित साहेबराव मोढवे हे दोघे तरुण मंचर येथील सतीश बेंडे पाटील यांच्याकडे काम करतात. आज सकाळी नऊ वाजता दोघे दुचाकीवरून वडगाव काशींबेगमार्गे मंचरला निघाले होते. साकोरे गावच्या हद्दीत दत्तात्रय भिकाजी मोढवे यांच्या रस्त्यालगत असलेल्या शेताच्या बांधावर तीन दिवसांपूर्वी सिमेंटचा विजेचा खांब उभा करण्यात आला होता. तेथे तारा ओढल्या नव्हत्या. रात्रीपासून पाऊस पडत असल्याने हा खांब अचानक रस्त्यावर कोसळून दुचाकीवरून चाललेल्या विशाल ढगे याच्या डोक्यात पडला त्याच्या छातीलाही मार लागला. दुचाकीवरील दोघे तरुण खाली पडले.तर दुचाकी बाजूला जाऊन पडली. विशाल ढगे हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला होता. अजित मोढवे यांनी जखमी अवस्थेही फोन करून ग्रामस्थांना कल्पना दिली.
अनिल गाडे, गणेश मोढवे, सचिन भेकें ,सचिन मोढवे, आशिष गाडे, विजय गाडे या तरुणांनी जखमी विशाल ढगे या तरुणाला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे तो उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेत अजित साहेबराव मोढवे हा जखमी झाला असून त्याच्यावर मंचर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस हवालदार राजेंद्र हिले व विलास साबळे यांनी पंचनामा केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशाल ढगे व अजित मोढवे हे दोघे मंचर येथील उद्योजक सतीश बेंडे पाटील यांच्याकडे काम करत होते.विशाल हा तरुण प्रेमळ स्वभावाचा असल्याने तो सर्वांशी परिचित होता.त्याच्या पाठीमागे आई, वडील ,भाऊ, बहीण असा परिवार आहे.