पुणे : खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात न्यायलयीन बंदी असलेल्याने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोेमवारी सकाळी घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाची कारागृह प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मंगेश विठ्ठल भोर (वय ३०, रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. भोरविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याची १६ जुलै २०२३ रोजी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. कारागृहातील कैद्यांना नेहमीप्रमाणे सकाळी नाश्ता करण्यासाठी बाहेर सोडण्यात आले. कारागृहाच्या आवारात असलेल्या औषध केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत मंगेशने टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. कारागृहातील कैद्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर रक्षकांना ही माहिती कळविण्यात आली. कारागृह अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. येरवडा कारागृहातील गैरप्रकार राेखण्यासाठी कारागृहात ८१२ सीसीटीव्ही कॅमेरे नुकतेच बसविण्यात आले.