पुणे : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे डेबीट कार्ड हातचालाखीने काढून घेत वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी पकडले. मयंककुमार संतराम सोनकर (२७, रा. द्वारका संकुल अपार्टमेंट, धानोरी, मुळ रा. हमीपुर, उत्तरप्रदेश) आणि कपिल राजाराम वर्मा (३०, रा. परांडेनगर, धानोरी, मुळ रा. बडनी, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी दाखल प्रकरणात, फिर्यादी हे २२ सप्टेंबर रोजी विश्रांतवाडी चौकातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी हातचालाखीने फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या पत्नीच्या नावे असलेले बँकेटे डेबीट कार्ड चोरले. यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून या कार्डच्या सहाय्याने पैसे काढले तर काही वस्तू खरेदी करत ८७ लाख ५८० रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान, पोलिस अंमलदार मोरे आणि खराडे यांना या प्रकरणातील आरोपी कस्तुरबा हाऊसिंग सोसायकडी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील सारस्वत बँकेच्या एटीएमजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून लाल रंगाच्या दुचाकीवर (एमएच १२ ईझेड ३३८६) आलेल्या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, मात्र आरोपी न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.आरोपींच्या अंगझडतीत सोनकर याच्या पँटच्या खिशात ४ हजार ५०० रुपये रोख आणि वेगवेगळ्या बँकेची १६ डेबिट कार्ड तसेच दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या पत्नीचे डेबीट कार्ड देखील आढळून आले. तर वर्मा याच्या पँटच्या खिशात ९ डेबिट कार्ड आढळून आले. या २५ कार्डबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली जिली. यावेळी आरोपींनी डेबिट कार्डद्वारे खरेदी केलेले ६.९ ग्रॅम वजनाचे ४५ हजार रुपयांचे सोने, ४९ हजार ७०० रुपये रोख, ५० हजारांची दुचाकी आणि ६२ डेबिट कार्ड जप्त केले.
ही कारवाई विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश चव्हाण, पोलिस अंमलदार चव्हाण, भोसले, मोरे, देवकाते, खराडे आणि पिसाळ यांच्या पथकाने केली.