पुणे : शादी डॉटकॉमवरून झालेली ओळख एका अभियंता तरुणीला चांगलीच महागात पडली. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सायबर चोरट्याने तिला साडे चाळीस लाख रुपयांचा गंडा घातला.
याप्रकरणी, केशवनगर मुंढवा येथील ३३ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार राजेश शर्मा, बँक खातेधारक व्यक्तींच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी खराडी परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करते. लग्नासाठी तिने शादी डॉटकॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तेथे राजेश शर्मा नावाच्या व्यक्तीसोबततिचा परिचय झाला. दोघांचे बोलणे सुरू झाले. शर्मा याने तरुणीला तो विदेशात असल्याचे सांगितले. पुढे संपर्क वाढत गेल्यानंतर शर्मा आणि तरुणी व्हिडिओकॉलद्वारे बोलत होते. एकेदिवशी शर्मा भारतात आला आणि त्यानेतरुणीसोबत लग्न करायचे आहे. तसेच घर खरेदी करून व्यवसाय करायचा आहे असे सांगितले. तरुणीला विश्वास वाटावा म्हणून त्याने प्रवासाची विमान तिकिटे खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तो दिल्ली विमानतळावर पोहचला असून, मॉनिटरींग फंड, सेंट्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशन, करन्सी कनव्हर्जनसाठी पैसे पाहिजे आहेत असे त्याने तिला सांगितले. तरुणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत वेळोवेळी त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर तब्बल ४० लाख ५० हजार रुपये पाठवले. मात्र काही दिवसातच तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार तिने मुंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निकम करीत आहेत.