लोणी काळभोर : कोरेगांव मुळ (ता. हवेली) येथे वायरीला हात लागल्याने तमाशा कलाकारांची वाहतूक करणा-या परप्रांतीय लक्झरी चालकाचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत जितेंद्र राधीकाप्रसाद पांडे (वय ३२, सध्या रा. ईश्वरनगर, वाशी बेलापूर रोड, ठाणे वेस्ट, मुंबई. मुळ रा. रामवापूर, ता. सिद्धार्थनगर, झकौहर बजार, उत्तर प्रदेश ) हे मृत्यूमुखी पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगांवमुळ गावचे ग्रामदैवताचे वार्षिक उत्सवासाठी किरणकुमार ढवळीपुरकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर तमाशाच्या कलाकारांना गावोगावी पोहचवण्यासाठी मुंबई येथील आश्विनी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस भाडेतत्वावर ठरविण्यात आली होती. जितेंद्र हे बसचालक म्हणून कार्यरत होते. ९ एप्रिलला टाकळी ढाकेश्वर (ता. पारनेर) येथील कार्यक्रम करून सर्व कलाकार लक्झरीने कोरेगावमुळ येथे पोहोचले होते. लक्झरी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मोकळ्या मैदानात उभी करण्यात आली होती. तिच्यावरून गावाला विद्युतपुरवठा करणा-या विद्युतभारीत तारा गेल्या होत्या. मध्यरात्री १.५५ वाजण्याच्या सुमारांस तमाशाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व जितेंद्र सोबत तमाशा व्यवस्थापक किरण गायकवाड, सुदेश शिमाणे, दिपक ससाणे व इतर कलाकार लक्झरीवर झोपण्यासाठी बसजवळ आले. सर्वजण गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी जितेंद्र हे लक्झरीच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीने वर गेले.
रात्रीच्या अंधारात त्यांना लक्झरीवरून गेलेली विद्युतभारीत तार दिसली नाही. पुढील बाजूला जात असताना त्यांचा हात तारेला लागल्याने शॉक लागून ते खाली पडले. यामुळे आरडाओरडा झाला. गायकवाड व इतर सहका-यांनी त्यांना पाहिले त्यावेळी त्यांची हलचाल मंदावली होती. उपचारासाठी त्यांना उरूळी कांचन येथील सिद्धिविनायक रूग्णालयात नेले. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.