पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) च्या संचालपदासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद आलकुंटे काँग्रेसच्या सहकार्याने विजयी झाले. भाजपाचे धनंजय जाधव यांचा पराभव झाला. शिवसेना सदस्यांनी नगरसचिवांना धक्काबुक्की केल्यामुळे महापौरांना त्यांना तंबी दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहिली.शिवसेना सदस्य विजय देशमुख यांचे नगरसेवक पद न्यायालयाने रद्द केल्यामुळे त्यांचे पीएमपीएलमधील संचालकपदही गेले. त्या रिक्त झालेल्या पदासाठी आज विशेष सभा आयोजित केली होती. सभेच्या सुरुवातीलाच भाजपा व शिवसेनेच्या सदस्यांनी देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपील केले असल्यामुळे ही निवडणुक घेता येत नाही, अशी भूमिका घेत निवडणुकीला विरोध केला. सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची इतकी घाई का झाली आहे, असा सवाल गणेश बीडकर व अशोक हरणावळ, पृथ्वीराज सुतार यांनी केला. राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप यांनी विकास आराखड्याबाबत आम्ही न्यायालयात गेलो असताना तुमच्या राज्य सरकारने आराखडा करण्याची घाई का केली, असा प्रतिसवाल करीत त्यांना निरूत्तर केले. त्यामुळे भाजपाने नरमाईची भूमिका घेतली.सेना सदस्य मात्र आक्रमक झाले. त्यांच्यातील हरणावळ तसेच सचिन भगत यांनी निवडणुकीची सूचना वाचत असलेल्या नगरसचिव सुनील पारखी यांना लक्ष्य केले. महापौरांच्या आसनाजवळ जात त्यांनी पारखी यांच्या हातातील कागद हिसकावून घेणे सुरू केले. त्यात भगत यांनी पारखी यांचा हात पिरगाळला. पारखी व नंतर सभागृहातील अन्य सदस्यही यामुळे चिडले. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे यांनी महापौरांवर तुम्ही कारवाई का करीत नाही, अशी मोठ्याने विचारणा केली. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी त्यांना यापुढेही तुमचे वर्तन असेच राहिले तर निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली. त्यानंतर सेना सदस्य निवडणुकीवर बहिष्कार घालत असल्याचे जाहीर करीत सभागृहाबाहेर निघून घेले.दरम्यान राष्ट्रवादीने या पदासाठी आलकुंटे यांची तर भाजपाने धनंजय जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. पारखी यांंनी हात वर करून मतदान घेतले. त्यात आलकुंटे यांना ७४ तर जाधव यांना २१ मते मिळाली. महापौर धनकवडे यांनी आलकुंटे विजयी झाल्याचे घोषित केले. त्यांच्यासह उपमहापौर आबा बागूल, अरविंद शिंदे, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समिती अध्यक्ष आश्विनी कदम व आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. (प्रतिनिधी)
पीएमपीच्या संचालकपदी आनंद आलकुंटे
By admin | Published: November 25, 2015 1:12 AM