लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पर्सिस्टंट या डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘पर्सिस्टंट’चे संस्थापक आनंद देशपांडे हे पुण्याचे पहिले ‘टेक बिलेनियर’ बनले आहेत. गेल्या दोन दिवसांत ‘पर्सिस्टंट’च्या समभाग मूल्यात (शेअर व्हॅॅल्यूत) झालेल्या वाढीमुळे देशपांडे अब्जाधीश बनले आहेत.
देशपांडे यांच्याकडे ‘पर्सिस्टंट’चे तीस टक्के शेअर्स आहेत. त्यांची आजची किंमत १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे साडेसात हजार कोटी रुपये आहे. पूनावाला, कल्याणी, बजाज यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके अब्जाधीश पुण्यात असले तरी हे सर्व उद्योगपती प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रातले आहेत. टेक्नॉलॉजीमधले पहिले अब्जाधीश पुणेकर देशपांडे ठरले आहेत.
देशपांडे यांनी सन १९९० मध्ये त्यांच्याकडची शिल्लक आणि वडील व मित्रांकडून घेतलेले कर्ज यातून २१ हजार डॉलर्स उभे केले आणि पर्सिस्टंट सिस्टिम ही टेक कंपनी पुण्यात सुरू केली. आज ही कंपनी ५६६ दशलक्ष डॉलर्सची आहे. मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने उत्पन्नात १३ टक्के वाढ केली. कंपनीचा निव्वळ नफा ३८ टक्क्यांनी वाढून ६२ दशलक्ष डॉलर्सवर गेला. पर्सिस्टंटच्या एकूण व्यवसायातील ८० टक्के वार्षिक महसूल अमेरिकेतून येतो. उर्वरीत वीस टक्के युरोपीय देश आणि भारतातून येतो. पर्सिस्टंटमध्ये आज ४५ देशांमधले १४ हजार तंत्रज्ञ काम करतात. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांच्याप्रमाणेच जागतिक प्रतिष्ठा मिळवणारी ही ‘लिस्टेड कंपनी’ आहे.
पर्सिस्टंटच्या शेअरमध्ये यंदा १४९ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच देशपांडे पुण्यातले पहिले ‘टेक बिलेनियर’ बनले आहेत.
दरम्यान २०१९ मध्ये देशपांडे यांनी कंपनीचे सीईओपद सोडले. ते आता अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळतात. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. देशपांडे मूळचे मध्य प्रदेशातील भोपाळ येथील असून त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. खरगपूर आयआयटीतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये अमेरिकेतून पीएचडी मिळवली. सन नव्वदमध्ये भारतात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ही संकल्पना सुरू झाल्यानंतर देशपांडे अमेरिकेतून भारतात परतले. ‘पर्सिस्टंट’व्यतिरिक्त स्वत:च्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते तरुणांना मार्गदर्शन करतात. पंचवीस हजार उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले असून उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना ते मार्गदर्शन करतात.