लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत गेली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या होती. त्यानंतर, कोरोनाबधितांची संख्या कमी-अधिक होत राहिली. गेल्या दोन महिन्यांत ही संख्या घटत गेली असून, सोमवारी (दि. १८) गेल्या आठ महिन्यांतील सर्वात नीचांकी रुग्णसंख्या नोंदविली गेली.
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता केंद्रीय पथकासह राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीही वर्तविली होती. पालिका प्रशासनाने १ ते १२ डिसेंबर या कालावधीतील रुग्ण संख्या महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले होते, परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या घटली, तसेच दैनंदिन कोरोनाबधितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली नाही.
कोरोनामुळे बाधित नागरिकांचे प्रमाण सप्टेंबरमध्ये सर्वाधिक होते. गणेशोत्सव काळातील गर्दी याला कारणीभूत ठरली होती. याच काळात शहरातील सर्व रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांच्या खाटा भरल्या. खाटा मिळण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या काळात सक्रिय रुग्णांची संख्या १७ हजारांच्या पार गेली. त्यामुळे चिंता वाढली होती, परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ही संख्या झपाट्याने खाली आली.
प्रशासनाने डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या वाढण्याचा बांधलेला अंदाजही सुदैवाने साफ चुकला. सोमवारी आजवरची नीचांकी रुग्णसंख्या असल्याचे सकारात्मक चित्र आहे. नागरिकांनी अधिक काळजी घेतल्यास कोरोनाला अटकाव करण्यास मदत मिळेल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.