-श्रीकिशन काळे
पुणे : हिंदुस्तानातील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारीचा रथ महात्मा फुले मंडईसमोर सकाळी सजावट करून ठेवण्यात आला होता. फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे पुणेकरांनी रथासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली. मानाचे पाच गणपतींची मिरवणूक मंडईसमोरून जाते. तेव्हा प्रत्येकजण रंगारी गणरायचा फोटो काढण्यासाठी मोबाईल पुढे सरसावत होता.
प्रथेप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती रथामध्ये बसून सकाळी ८.३० वाजता मंडईसमोर आकर्षक फुलांच्या सजावटीमध्ये ठेवण्यात आली होती. तिथून सकाळी १०.३० वाजता मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक सुरू झाली. रंगारी गणपतीची मिरवणूक साधारणपे रात्रीच्या सुमारास निघणार आहे. श्रीराम, नादब्रम्ह, सर्ववादक, समर्थ प्रतिष्ठान यांची पथके त्यामध्ये आपली सेवा देणार आहेत. याशिवाय शंख वादन आणि मर्दानी खेळ पाहता येणार आहे.
एक चिमुकला छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये आला होता. त्याने भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या रथामध्ये बसून जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करण्यात येत होता. त्या बालशिवाजीचा फोटो काढण्यासाठीही गर्दी झाली हाेती.