पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (दि. ९) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. या सोहळ्यात काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरून मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पाेलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेआठ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी केली आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर तसेच उपनगरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत.
विसर्जन मार्गावर दागिने, मोबाइल संच हिसकावणे तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत.
शहरात वाहतूक बदल
शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षात किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा असेल बंदोबस्त
- पोलीस उपायुक्त १०
- सहायक पोलीस आयुक्त २३
- पोलीस निरीक्षक १३८
- सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ६२५
कर्मचारी ७७४२ विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदाेबस्तात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साडेआठ हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.
- आर. राजा, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा