पुणे : गणेशोत्सवाच्या शेवटच्या तीन चार दिवसांमध्ये पावसाने दाणादाण उडाली. परिणामी देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला. अनंत चतुर्दशीच्या दिवशीही असाच पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला हाेता. मात्र, या अंदाजाला गणपती बाप्पाने चकवा दिल्याची भाविकांमध्ये चर्चा झाली. पावसाच्या शक्यतेने सायंकाळपर्यंत नेहमीची गर्दी नसलेल्या विसर्जन मिरवणुकीत रात्री विक्रमी गर्दी करत भाविकांनी चार चांदणे लावले. दोन दिवस चाललेल्या विसर्जन मिरवणुकीला भाविकांनी प्रचंड गर्दी केलीय.
दिवसा वाढलेले तापमान, त्या जोडीला वाढलेली आर्द्रता यामुळे शहरात गेल्या तीन चार दिवसांपासून सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या सरी बरसत हाेत्या. त्यामुळे भाविकांच्या उत्साहावर पाणी फिरले होते. शेवटच्या दिवशीही पाऊस आल्यास मिरवणूक बघण्यासाठी गर्दी होणार नाही असा अनेकांचा होरा हाेता. वास्तविक हवामान विभागाने शनिवारी अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशीही सायंकाळनंतर मध्यम स्वरुपाच्या पावसासह १-२ जोरदार सरी पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शनिवारी सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. दुपारी ऊन पडले. उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे सायंकाली पाऊस पडणार, असे वातावरण होते. परिणामी सकाळपासूनच मिरवणूक पाहण्यासाठीची गर्दी तुलनेने कमी होती.
...अन् गर्दी वाढली
मानाच्या गणपतींचे विसर्जन पाहण्यासाठी एरवी पुणेकर सकाळपासूनच गर्दी करतात. यंदा मानाच्या गणपतींचे विसर्जन दुपारी तीननंतर सुरू झाले. मात्र, या वेळी उन्हाचा चटका वाढलेला होता. त्यामुळेही गर्दी कमी होती. त्यानंतर ढगाळ वातावरण झाले. गर्दी काही केल्या वाढताना दिसत नव्हती. पावसाची शक्यता असल्याने पुण्यात येणाऱ्या उपनगरांतील नागरिकांनी लवकर येण्याचे टाळले. मात्र, सायंकाळ उलटल्यानंतर पाऊस येणार नाही याची खात्री झाली आणि गर्दी वाढली.
भाविकांनी रस्तेही ‘ओव्हर फ्लाे’
पाऊस न आल्याने मिरवणुकीत रंग चढत हाेता, त्याच वेळी गर्दी वाढू लालगी. उपनगरांतील अनेकजण कुटुंबकबिल्यासह मिरवणूक पाहण्यासाठी दाखल होऊ लागले. महाविद्यालयीन तरुण तरुणींचे जथ्थे हळहळू टिळक चौकाकडे येऊ लागले. ही गर्दी एवढी वाढली की शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर, टिळक रस्ते अक्षरश: ओसंडून वाहत होते.