इंदापूर: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील गोतोंडी येथील अनंता सोपान माने या तरूणाचा खून हा सावकारीतून व मित्र शिवराज हेगडे यानेच डोक्यात दगड घालून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी मंगळवारी सोमनाथ माने यांनी सोमनाथ जळक आणि हेगडे याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी हेगडे व दिपाली पवार यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंता माने याने २ वर्षांपूर्वी त्याचा निमगाव केतकी येथील मित्र शिवराज याच्या मध्यस्थीने तरंगवाडी (ता. इंदापूर) येथे राहणारा सावकार सोमनाथ जळक तसेच अकुलूज येथील दिपाली पवार यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याने वेळोवेळी त्यांचे पैसे पूर्ण फेडले होते. मात्र, तरीही त्याचा पैशासाठी हे तिघे छळ करत होते. त्याच्या छळाला कंटाळून तो पुण्याला निघून आला होता. त्यानंतर सुध्दा आरोपींनी त्याचा छळ सुरू ठेवला होता. रविवारी (दि. ३०) सावकाराने अनंता माने याला भेटायला बोलावले होते. हेगडे आणि अनंता दोघेही सोबत दारू प्यायले. यावेळी पैसे देत नसल्याने हेगडे याने अनंताच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत कबूल केले. दुस-या दिवशी (दि.१) शिवराज याने अनंताचे वडील सोपान माने यांना घेऊन अनंताच्या अपहरणाची तक्रार इंदापूर पोलिस ठाण्यात दिली. शिवराज अनंताच्या सोबत असल्याने सोमनाथ यांना शंका आल्याने मंगळवारी सोमनाथ माने यांनी सोमनाथ जळक आणि शिवराज हेगडे याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मंगळवारी रात्री अनंताचा मित्र शिवराज हेगडे व बुधवारी दिपाली पवार यांना अटक केली. त्यानंतर ही माहिती उघड झाली. हेगडे याने दिलेल्या माहितीनुसार अनंता माने व शिवराज यांनी निमगाव केतकी येथे ( दि. ३० ) सप्टेंबर रोजी सकाळी १२ वाजता मद्यपान केले. यानंतर ते दोघे आबा हेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ जाऊन झोपले. अनंता झोपेत असताना शिवराजने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा मृत्यू झाला. सावकार सोमनाथ जळक हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिपाली मधुकर पवार यांना इंदापूर न्यायालयालयापूढे हजर केले असता तिला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर शिवराज कांतीलाल हेगडे याला ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे यांनी दिली आहे.
इंदापूर येथील अनंता मानेचा खून सावकारीतूनच ; मित्रानेच केला घात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 9:52 PM
व्याजाच्या पैशांची परतफेड झाल्यावर देखील आरोपी अनंता मानेचा छळ करत होते
ठळक मुद्देप्राथमिक पोलीस तपासात उघड : दोघांना अटक सावकार सोमनाथ जळक हा फरार असून त्याचा शोध सुरु