पुणे : सकाळी ८ ची वेळ... मुंबईच्या दिशेने डेक्कन क्वीन झेपावत होती... मळवली ते लोणावळादरम्यान याच मार्गावर काही अंतरावर एक लोकल असल्याचे दिसते... ही लोकल पुण्याकडे येत असल्याने आता दोन्ही गाड्या समोरासमोर येणार या भीतीने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकतो... पण प्रत्यक्षात लोकल लोणावळ्याकडे जाणारीच होती. पुढे काही तांत्रिक कारणांमुळे थांबली असल्याचे प्रवाशांच्या लक्षात येते. ही कमाल आहे, ऑटोमॅटिक ब्लॉग सिग्नलिंग यंत्रणेची.दररोज सकाळी ७.२० वाजता पुणे स्टेशन येथून डेक्कन क्वीन मुंबईच्या दिशेने रवाना होते. त्याआधी अर्धा तासापुर्वी लोणावळा लोकल निघाली होती. मळवली व लोणावळादरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने ही गाडी मळवली स्थानकाजवळ थांबते. या गाडीच्या मागेच डेक्कन क्वीन धावत असल्याने काही वेळात या लोकलपासून १०० ते १५० मीटर अंतरावर थांबते. लोकलला दोन्ही बाजुला इंजिन असल्याने डेक्कन क्वीनमधील प्रवाशांना ही गाडी आपल्याच दिशेने येत असल्याचा समज झाला. दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याचा समज होऊन एकच गोंधळ उडाला. पण प्रत्यक्ष स्थिती लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, रेल्वेमार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे एकाचवेळी एकामागोमाग एक दोन-तीन गाड्या असु शकतात. लोकलला दोन्ही बाजूने इंजिन असल्याने प्रवाशांचा गैरसमज झाला. पण काळजी करण्यासारखे काही नसल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले.-------------------------------* ऑटोमॅटिक सिग्नलने वाढली रेल्वेची धावदेशभरातील अनेक मार्गांवर ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग यंत्रणा उभारण्यात आली आहे. मुंबईतील लोकल गाड्या या यंत्रणेद्वारेच धावतात. मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये लोणावळा ते चिंचवड दरम्यान प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर असे सिग्नल उभारण्यात आले आहे. तर चिंचवड ते शिवाजीनगर दरम्यानही सिग्नल उभारण्याचे काम सुरू आहे. या यंत्रणेमुळे एकाच मार्गावर एकामागोमाग एक गाड्या धावु शकतात. पुणे रेल्वे स्थानकातून लोकलसह मुंबईच्या दिशेने पुर्वी दिवसभरात १०० गाड्या धावत होत्या. या यंत्रणेमुळे ही क्षमता १४० पर्यंत पोहचली आहे. सिग्नल यंत्रणेमुळे एखादी गाडी पुढे धावत असल्यास पाठीमागून येणाºया गाडीला प्रत्येक किलोमीटर अंतरावर रेड किंवा ग्रीन सिग्नल दिला जातो. पुढील गाडी थांबलेली असल्यास, वेग कमी झाला असल्यास मागील गाडीला एक किलोमीटरवरच रेड सिग्नल मिळतो. त्यामुळे ही गाडी किमान एक मिनीटापर्यंत थांबते. त्यानंतर दिवसा ताशी १५ किलोमीटर वेगाने या गाडीला पुढे जाण्याची परवानगी असते. पुढील गाडी दिसल्यानंतर किमान १५० मीटर अंतरावर थांबणे आवश्यक आहे. रेल्वेगाडीचे अंतर सुमारे ७०० मीटरपर्यंत असते. त्यामुळे पुढील सिग्नलला एखादी गाडी उभी असल्यास मागील गाडी त्याआधीच्या सिग्लनलाच थांबते. या यंत्रणेमुळे एकाच दिशने जाणाºया गाड्या एकमेकांना धडकु शकत नाहीत. प्रत्येक एक किलोमीटरला सिग्नलद्वारे ‘ब्लॉक’ करण्यात आल्याने त्यामधील गाडी ‘ट्रॅक’ होते. त्यानुसार इतर सिग्नलला आपोआप सुचना पाठविल्या जातात. यंत्रणेमुळे रेल्वेमार्गाची क्षमता वाढल्याने गाड्यांची संख्याही वाढली आहे. याचा फायदा प्रवाशांनाही होत आहे. पुर्वी ही यंत्रणा नसल्याने गाड्यांना एखाद्या स्थानकावरच थांबावे लागत होते. पुढील गाडी स्थानक सोडून गेल्यानंतर मागची गाडी रवाना होत होती. आता सिग्नल यंत्रणेमुळे चिंचवड ते लोणावळादरम्यान कोणत्याही स्थानकावर थांबावे लागत नाही. एकामागोमाग एक गाड्या धावत असतात. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. त्यामुळे वेळ वाचण्याबरोबरच अधिक गाड्या मार्गावरून धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. -----------
... अन् ‘डेक्कन क्वीन’ प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 3:48 PM
दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याचा समज होऊन एकच गोंधळ उडाला.
ठळक मुद्देऑटोमॅटिक सिग्नलने वाढली रेल्वेची धाव