पुणे - जिल्हा न्यायालयापासून अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव करणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना न्यायालयाने अनेकदा फटकारुनही त्यांना रुबाब कायम होता. आपण ठेवीदारांचे पैसे परत करणार असल्याचे ते मोठ्या विश्वासाने बोलत होते़ त्यांच्या देहबोलीतून आपण या आर्थिक संकटात अडकलो असून त्यातून निश्चितच बाहेर पडणार आणि सर्वांचे पैसे देणार असे ते माध्यमांना मुलाखती देऊन ठामपणे सांगत होते. पण, शनिवारी सायंकाळी जेव्हा त्यांना न्यायालयात आणण्यात आले़ तेव्हा त्यांचा हा सर्व रुबाब उतरला होता़ ते अगदी मलुल चेह-याने न्यायालयाचे कामकाज ऐकत होते़
बाहेर रुबाबात वावरणा-याचे पोलिसांपुढे काहीही चालत नाही, असे म्हटले जाते़ ते शनिवारी डी़ एस़ केंच्या बाबतीत जाणवून आले. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आॅक्टोंबर २०१७ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला. तेथे तो अर्ज फेटाळल्या गेल्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले. तेथेही त्यांचा अर्ज फेटाळला गेल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तुम्ही ठेवीदारांचे पैसे परत करणार असणार असाल तर उच्च न्यायालयात प्रथम ५० कोटी रुपये जमा करुन प्रत्यक्ष कृतीने दाखवून द्या, असा आदेश दिला. त्यानंतर गेले महिनाभर उच्च न्यायालयाने वारंवार त्यांना पैसे भरण्यासाठी मुदत दिली होती़ या दरम्यान, त्यांनी वेगवेगळ्या वेळी माध्यमांना मुलाखती देऊन आपल्याला लोकांचा कसा पाठिंबा आहे़ लोक आपल्याला पैसे देण्यास कसे तयार आहेत, हे सातत्याने सांगत होते.
उच्च न्यायालयाने पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत दररोज चौकशीला उपस्थित रहा, असा आदेश दिल्यानंतर ते चौकशीला उपस्थितही राहिले होते़ तेथून बाहेर पडताना माध्यमाचे प्रतिनिधी त्यांचे छायाचित्र, व्हिडीओ शुटिंग करु लागले तेव्हा त्यांनी फोटो काढायचे तर व्यवस्थित तरी काढा, असे सांगत फोटोसाठी पोझ दिली. या सर्व काळात ते आपल्या नेहमीच्यात रुबाबात वावरत होते़ ते नेहमी कोट, टाय अशा वेशात वावरत होते.
पण, शनिवारी त्यांना दिल्लीत अटक झाली़ त्यानंतर त्यांना सायंकाळी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात आणण्यात आले. तेव्हा इतके दिवस ज्या रुबाबात ते वावरत होते. तो सर्व रुबाब विरुन गेलेला दिसत होता. नेहमी कोट, टाय लावणारे डीएस कुलकर्णी यांनी साधा टी शर्ट घातला होता. त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी याही साध्याच साडीमध्ये दिसून आल्या. इतके दिवस मोठ मोठी आश्वासने देणारे हेच का डीएसके यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता.