ओतूर: वडगाव कांदळी (ता.जुन्नर ) येथे रविवारी (दि.७ ) शेतामध्ये ऊस तोडणीचे काम चालू असताना संध्याकाळी साडेपाच वाजता मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले आढळली.
ओतूरचे वनक्षेत्रपाल योगेश घोडके म्हणाले, वडगाव कांदळी येथे निवृत्ती मुटके यांच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम सुरु असताना मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले आढळली. याबाबत मुटके यांनी याबाबत ताबडतोब वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर जुन्नरचे वन परिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकडोह निवारा केंद्रातील कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर, सहाय्यक पशुवैद्यक महेंद्र ढोरे, ओतूरचे वन कर्मचारी कैलास भालेराव व सचिन मोडवे या सर्वांनी याठिकाणी येऊन पाहणी केली. त्यानंतर डॉक्टर बनगर यांनी बिबट्याच्या पिल्लांची आरोग्य तपासणी केली.
याबाबत माणिकडोह डॉ. निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, याठिकाणी सापडलेल दोन महिन्याची तीन पिल्ले पैकी दोन नर एक मादी असून ज्याठिकाणी पिल्ले सापडली होती. तेथे पिल्लांना सुरक्षित ठेवण्यात आले. बरोबर सात वाजता बिबट्या मादीने आपल्या पिल्लांना सोबत घेऊन नैसर्गिक अधिवासात प्रस्थान केले.