पुणे : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पुण्यात सुरू झालेल्या अघोषित आंदोलनाचे नेते बनले युवा नेते आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर. अचानकपणे राज्याच्या विविध शहरांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर भाजपाच्या इतर नेत्यांनीही पुण्यातल्या विद्यार्थी आंदोलनाला भेट दिली. पण पडळकर ‘अचानक’पणे कसे पोहोचले?
गुरुवारी (दि. ११) दुपारी एक वाजता एमपीएससीच्या १४ मार्चला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची बातमी राज्यभर पसरली आणि त्यानंतर संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पुण्यात अभ्यासासाठी राज्यभरातून आलेले विद्यार्थी नवी पेठ, सदाशिव पेठ या परिसरातल्या अभ्यासिकांमध्ये सर्वाधिक संख्येने आहेत. हे विद्यार्थी संतापाला वाट मोकळी करुन देण्यासाठी लोकमान्य टिळक चौक (अलका टॉकीजजवळ) तसेच शास्त्री रस्त्यावर जमले.
त्याचेवळी नवी पेठेत असणाऱ्या पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात पडळकर एका कार्यक्रमासाठी आले होते. विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची माहिती होताच पडळकर हेही त्या आंदोलनात सहभागी झाले. पडळकर यांनी सांगितले की, संतापलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी माझी भेट घेतली. मी येथे मुंबईतून एका कार्यक्रमासाठी आलो होतो. मग मी विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि एक वाजल्यापासून त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालो.
चौकट
रोहित पवारांवर टीका
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार झाल्या पाहिजेत अशी भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. त्यावर पडळकरांनी टीका केली. ते म्हणाले की, त्यांनी सूचना नव्हे तर निर्णय घ्यायला हवा. रोहित पवारांचा पक्ष सत्तेत आहे, ‘ट्विट’ करू नका निर्णय घ्या.”
चौकट
कॉंग्रेसचाही घरचा आहेर
“अवघ्या तीन दिवसांवर आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलणे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. विद्यार्थ्यांच्या असंतोषाची दखल घेत सरकारने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा,” अशी मागणी करत राज्य प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी महाआघाडी सरकारला घरचा आहेर दिला. मोठ्या अपेक्षेने अथक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशांवर ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने पाणी पडते, असे जोशी म्हणाले.