पुणे : विविध गुन्ह्यांत जप्त केलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पोलिसांनी संबंधितांना परत केल्याने त्याचा गुढीपाडवा अधिकच गोड होणार आहे.घरात, दुकानावर दरोडा पडला, रस्त्यातून जाताना चोरट्याने जबरदस्तीने गळ्यातील सौभाग्यलेणे हिसकावून नेले़ काही दिवसांनी पोलिसांनी चोरट्यांना पकडले़ त्यांच्याकडून दागिने जप्तही केले़ पण, ते होते पोलीस ठाण्याच्या कोठडीत़ साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा जवळ आलेला. असे असताना महिलांना हे दागिने घरात नसल्याची रुखरुख होत होती़ ही रुखरुख संवेदनशील असलेल्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हेरून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पोलीस ठाण्यात पडून असलेले दागिने तक्रारदारांना परत करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला आणि त्यातून गुरुवारी ४८ गुन्ह्यांतील ५८ लाख ४५ हजार २४७ रुपयांचे १ किलो ८३६ ग्रॅम सोन्याचे दागिने, १०१६ ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम ४८ तक्रारदारांना समारंभपूर्वक परत करण्यात आली़पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते शिवाजीनगर मुख्यालयात तक्रारदारांना जेव्हा त्यांचे दागिने परत करण्यात आले तेव्हा अनेकांना गहिवरून आले़ रश्मी शुक्ला म्हणाल्या, तुमची वस्तू पोलीस ठाण्याची होता कामा नये़ अशा कामामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावत आहे़ वर्षभरात ५ कोटी रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला़ या वेळी दागिने परत मिळलेल्यांपैकी लक्ष्मीनारायण चिवडा दुकानाचे मालक प्रशांत डाटा म्हणाले, ‘‘आमच्या घरी चोरी झाली़ पोलिसांनी १२ तासांत चोरट्याला पकडले़ त्याने चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये आमच्या आईच्या भावना गुंतवल्या होत्या़’’अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले़ या वेळी सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर उपस्थित होते़ पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आभार मानले़>शिक्षकांचा वस्तुपाठचोरी होत असल्याचे लक्षात आल्यावर काय करावे, याचा वस्तुपाठ निवृत्त शिक्षक तानाजी पाटील यांनी सांगितला़ ते व त्यांची पत्नी बसने जात असताना एक चोरटा त्यांच्या पत्नीच्या हातातील सोन्याची बांगडी कट करीत होता़ हे पाहून त्यांनी त्याला पकडले़ तो पळून जाऊ नये, म्हणून बसमधील एका प्रवाशाने त्यांना मदत केली़ त्यांनी चोरट्याच्या खिशातील आधारकार्ड व मोबाईल काढून घेतले़ जेणेकरुन तो पळून गेला तरी त्याचा पत्ता लागू शकेल़ बस थेट ठाण्यात घेऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़
...अन् गुढीपाडवा झाला अधिक गोड, ४८ तक्रारदारांना दागिने परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:21 AM