पुणे : बँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत थांबलेल्यांना हेरुन त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने पैसे लांबविणार्या टोळ्या पुण्यात अधूनमधून कार्यरत राहतात़ या टोळीने कोंढव्यातील एका तरुणाला आपला हिसका दाखविला असून त्याच्याकडील २० हजार रुपये आणि मोबाईल चोरुन नेला आहे़ याप्रकरणी लोकेश शर्मा (वय २५, रा़ साईनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना कोंढव्यातील स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी सकाळी घडली़ लोकेश शर्मा हे मूळचे बिहारचे असून पुण्यात फर्निचर बनविण्याचे काम करतात़ त्यांचे स्टेट बँकेच्या कोंढव्या शाखेत खाते आहे़ बँकेतील शाखेत ते पैसे भरण्यासाठी आले होते़ रांगेत असताना एकच त्यांच्याकडे आला व मलाही १ लाख ३० हजार रुपये भरायचे आहेत़ ही पिशवी तुमच्याकडे ठेवा, असे सांगून त्याने एक पिशवी शर्मा यांच्याकडे दिली़ शर्मा यांनी पाहिले तर त्यात नोटांच्या आकाराचे बंडळ दिसून आले़ त्यानंतर त्याने त्यांना बोलण्यात गुंतवून तुमची पिशवी माझ्याकडे द्या, असे सांगितले़ त्याची १ लाख २० हजार रुपयांची पिशवी आपल्याकडे असल्याचे शर्मा यांच्या समज झाल्याने त्यांनी आपल्याकडील २० हजार रुपये व मोबाईल असलेली पिशवी त्याच्याकडे दिली़ त्यानंतर तो फोन करायचा आहे, असे सांगून बाजूला गेला़ शर्मा हे बराच वेळ त्याची वाट पहात राहिले तरी तो आला नाही़ तेव्हा त्यांनी पिशवी उघडून पाहिली तेव्हा त्या पिशवीत नोटांच्या आकाराचे कागदाचे तुकडे गुंडाळून ठेवले असल्याचे दिसून आले़ आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी सांगितले की, असाप्रकारे बँकांमध्ये जाऊन लोकांची फसवणूक करणारी टोळी इराणी टोळी नावाने पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे़ बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्यांना कधी नोटा मोजून देतो, असे सांगून हातचलाखीने पैसे काढून घेतात़ दर वेळी ते वेगवेगळी कारणे सांगून लोकांची फसवणूक करत असल्याचे गुन्हे यापूर्वी शहराच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत़
...आणि हाती आले नोटांच्या आकाराचे कागदी तुकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 3:42 PM