नीलेश राऊत-पुणे : एका कुटुंबात एकच मदत कीट मिळेल असे फोनवरून खडसावून सांगणारा अधिकारी मदत कीट घेऊन संबंधिताच्या घरी गेला. कागदपत्रे तपासली, सह्या,फोटो घेणे आदी सोपस्कार पार पाडून ती मदत दिलीही़; पण त्याचवेळी त्या अपंग व्यक्तीने जरा घरात या म्हणून विनंती केली असता, घरातील दृश्य पाहून तो अधिकारी स्तब्ध झाला आणि एक ऐवजी दोन मदत किट देत पुढील मदतीसाठी आश्वासन देऊन तेथून निघून आला.दिव्यांग व ज्येष्ठ निराधार व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेने मदत कक्ष उभारला आहे. येथे नित्याने शेकडो फोन येतात, यातील अनेक फोन हे सधन नागरिकांचेही असतात. त्यामुळे कक्षातील तसेच मदत वितरित करणारे अधिकारी कर्मचारीही गैरफायदा घेणाऱ्या या प्रवृत्तीला वैतागले आहेत. अशातच आपले काम सुरू ठेवताना, नुकताच एक हृदय हेलवणारा अनुभव एका अधिकाऱ्याला आला़ आणि कामाचा भाग म्हणून आपण काम करित राहिलो तर त्रासच वाटेल, पण सेवा म्हणून विचार केला तर कामाचा नक्कीच आनंदही मिळेल याची जाणीव व गरजवंताच्या उपयोगी आपण आलो याचे मोठे समाधान घेऊन तो अधिकारी कर्फ्यु असलेल्या भागातून परतला.पुणे महापालिकेकडून 'दिव्यांग व ज्येष्ठ निराधार व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा' करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़.येथे दररोज शेकडो जण मदत किट मिळावे यासाठी नावनोंदणी करीत आहेत. या नावनोंदणीप्रमाणे सकाळी नेहमी प्रमाणे मदत कीट वाटप करण्यापूर्वी, विभागनिहाय मागणीधारकांची यादीची छाननी करण्यात आली. यामध्ये एका अधिकाऱ्या ला दोन नावात साधर्म्य आढळून आले. मग काय लगेच त्याच्यातील सरकारी कर्मचारी जागा झाला अन् काहीश्या गुर्मितच संबंधिताला फोन लावून एका कुटुंबात एकच कीट मिळेल म्हणून खरमरीतरित्या सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीनेही या आवाजापुढे काहीशी माघार घेत ठीक आहे, परंतु घरी तर या म्हणत फोन ठेवला. कर्तव्य बजाविणारा तो अधिकारी कर्फ्यू लागलेल्या भागात पत्ता शोधत संबंधित ठिकाणी गेला़ घराजवळ गेल्यावर पालकांसोबत एक अपंग मुलगा रस्त्याशेजारीच बसलेला त्यांना दिसला. सर्व तपासणी केल्यावर मदत किट देताना, त्या अपंग मुलाच्या पालकाने घरात या नी याच्या बहिणीकडे एकदा पाहता का? म्हणून आग्रह धरला. खरंतर त्या अधिकाऱ्याला पुढचं काम उरकायची घाई होती. पण त्याने त्यांची ही विनंती मान्य केली़ व जेमतेम दोन फूट रुंदीच्या जिन्यातून पत्रा खोली सदृश घरात गेले असता समोरच्या दृश्याने त्यांचे मन हेलावले. अपंग भाऊ निदान बसू तरी शकत होता पण बहीण तर उठू ही शकत नव्हती. कायम पुर्णत: झोपून असणारी ती मुलगी पाहून तो अधिकारी स्तब्ध झाला. पण लगेच भानावर येत त्यांनी त्या अपंग मुलाच्या वडिलांना तुम्हाला अजून एक कीट देतो म्हणून सांगितले. पण त्या गृहस्थाने या बोलण्याकडे दूर्लक्ष केलं. यामुळे त्या अधिकाºयासही काही समजेनासे झाले़ तेव्हा त्या अपंग मुलांच्या आईने आमच्या ह्यांना जरा कमी ऐकू येत असे सांगितले.हातावर पोट असलेल्या या कुटुंबात दोन अपंग मुले, वडिलांची अडचण आणि संसाराचा गाडा चालविणारी माता कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात हतबल होऊन दोन वेळच्या अन्नाला महाग झाले आहे. अशावेळी सरकारी सोपस्कार बाजूला सारून एका ऐवजी दोन मदत किट देण्याबरोबरच लॉकडाऊन उठेपर्यंत मदत करण्याचे आश्वसन देणाऱ्या संबधित पालिका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.मी जर ही मदत दिली नसती तर अधिकारी म्हणून काय तर स्वत: ला माणूस म्हणायची पण लाज वाटली असती अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कामाचा भाग म्हणून आपण काम करित राहिलो तर त्रासच वाटेल, पण 'सेवा म्हूणून विचार केला तर कामाचा नक्कीच आनंदही मिळेल' असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. -----------------------------------------
....आणि ‘ती’ बिकट परिस्थिती पाहून महापालिका अधिकाऱ्याच्या काळजातला ‘माणूस’गहिवरला..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:55 PM
मी जर ही मदत दिली नसती तर अधिकारी म्हणून काय तर स्वत: ला माणूस म्हणायची पण लाज वाटली असती...
ठळक मुद्देदिव्यांग व ज्येष्ठ निराधार व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेचा मदत कक्ष