पुणे - दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'नाळ' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. नाळ चित्रपटाच्या प्रिमियर शोसाठी दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे पुण्यात आले होते. त्यावेळी, पुण्यातील सोलापूर फेस्ट महोत्सवात त्यांनी हजेरी लावली. या महोत्सवात एका डोळ्यानं अंध असलेल्या महेश मस्के या चित्रकाराने नागराज यांना त्यांचे पेन्सिल चित्र भेट दिले. महेशने काढलेलं चित्र पाहून नागराज अण्णा भारावले. तसेच आगामी काळात आपण नक्की भेटू असेही अण्णानं म्हटले. नागराज यांचा जबरा फॅन असलेल्या महेशला अण्णांच्या भेटीनं अत्यानंद झाला.
पुण्यातील पंडित फार्म्स येथे सोलापूर फेस्ट 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. ‘सोलापूर फेस्ट’ प्रदर्शनाच्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांना सोलापुरी उत्पादनांची खरेदी करता यावी, तसेच अस्सल सोलापुरी चवीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा आणि सोलापूरची ओळख जगभर व्हावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनने या महोत्सवाचे आयोजन केलं आहे. या महोत्सवाला मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील असलेल्या नागराज मंजुळे यांनी भेट दिली. त्यावेळी, या प्रदर्शनात सोलापूरच्या जामगाव या खेड्यातील एका तरुण चित्रकाराने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन पाहून नागराज भारावले. प्रदर्शनात फिरताना नागराज यांना पेन्सिलने रेखाटलेलं त्यांचच चित्र पाहायला मिळाल्यानं आश्चर्य वाटलं. विशेष म्हणजे ज्या चित्रकाराने हे चित्र रेखाटल, तोही सोलापूर जिल्ह्यातलाच असून एका डोळ्यानं अंध आहे. त्यामुळे नागराज यांनाही या अंध चित्रकार महेशचे कौतूक वाटले. महेशच्या संपूर्ण चित्रप्रदर्शनाला भेट देऊन नागराज यांनी महेशचे कौतूक केलं. तसेच आगामी काळामध्ये नक्कीच आपण पुन्हा भेटू व या गोष्टीवर विचार करू, असे नागराज यांनी महेशला म्हटले.
दरम्यान, महेश हा बार्शी तालुक्यातील जामगाव या छोट्याशा खेडेगावातला राहणारा असून नुकतेच त्यानं पुण्यात स्थलांतर केलं आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून तो पुण्यात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. आजपर्यंत शरद पवारांसह, उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही चित्र रेखाटून त्यांना भेट दिले. तर, दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचेही हुबेहुब चित्र रेखाटले असून महेशच्या कलेच आणि त्यांच्या जिद्दीचं सोलापूर फेस्टला भेट देणाऱ्यांकडून कौतूक होत आहे.