पुणे : शनिवारवाडा-मंडई-लक्ष्मीरस्ता... सर्वत्र एकच चर्चा... अरे आम्हाला चार्ली भेटला.... कशासाठी... आवर्जून मतदान करावे... यासाठी... असेच काहीसे मध्यवस्तीतील नागरिक गुरुवारी एकमेकांशी बोलत होते. महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्यावतीने मतदार जनजागृती कार्यक्रम सुरु असून चार्ली आणि लॉरेल अॅन्ड हार्डीच्या वेषातील कलाकार नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठया प्रमाणावर मतदान करावे याकरिता पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याची शक्कल लढविण्यात आली आहे. हा प्रयोग शहराच्या विविध भागांमध्ये राबविण्यात येणार आहे. चार्ली चॅप्लीन आणि लॉरेल-हार्डीसारख्या अजरामर हास्य कलाकारांच्या वेषभूषेतील कलाकारांची मदत पालिकेकडून घेण्यात येत आहे.
चार्लीच्या वेषातील प्रभाकर शिरगांवकर आणि लॉरेलच्या वेषातील अरूण ओव्हाळ यांनी नागरिकांचे मनोरंजन करीत करीत मतदानाचे महत्व, लोकशाही आणि मतदारांचे अधिकार याविषयी प्रबोधन केले. रस्त्याने जाणारे-येणारे नागरिक, स्थानिक नागरिक, व्यापारी, दुकानदार, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक या दोघांना बघून थांबत होते. त्यांच्याकडून सांगितल्या जाणाºया गोष्टी ऐकून अनेकांनी आम्ही मतदान करणारच आहोत, आपणही करा संदेश एकमेकांना दिला.