पुणे : सैनिकाचा पोशाख एकदा का अंगावर घातला की ऊन, वारा आणि पाऊस यांची पर्वा करायची नसते. अंगातील रगीच्या जोरावर अन मनातील आत्माविश्वासाच्या साथीने विजयश्री खेचून आणणे महत्त्वाचे. डिसेंबरच्या १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाची गोष्टच वेगळी होती. यात भारताने पाकिस्तानला जेरीस आणून विजय संपादन केला खरा. त्यात पाकिस्तानने शेख मुजीबूर रहमानच्या कुटुंबीय आणि शेख हसिना यांना ओलीस ठेवले. पोटाला पिस्तूल लावलेले अन् आम्ही पूर्णपणे नि:शस्त्र असताना त्यांना सोडून आणता आले, याचे समाधान वाटते. या शब्दांत निवृत्त कर्नल अशोक तारा यांनी आपल्या युद्धप्रसंगातील विविध आठवणींना उजाळा दिला. यातील शेख हसिना म्हणजे सध्याच्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना या होय.
येत्या १६ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाला ४0 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पुण्यातील वॉर मेमोरियलला भेट दिली. त्या भेटीनंतर त्यांंनी माध्यमांच्या काही प्रतिनिधींशी संवाद साधला. १९६३ मध्ये सैन्यात भरती झालेल्या कर्नल तारा यांना बांग्लादेशकडून ‘फ्रेंड्स आॅफ बांग्लादेश’ अशा पुरस्काराने सन्मानित केले. याचे कारण म्हणजे त्यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानने ओलीस ठेवलेल्या शेख मुजीबुउर रहमान यांच्या कुटुंबात आताच्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा समावेश होता.
दस्तुरखुद्द हसीना यांनी भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही आठवण सांगताना कर्नल अशोक तारा यांचा उल्लेख ‘मेरे बडे भाई’ असा करून दिला. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धात राजस्थानातील बरमार भागात तारा यांची नेमणूक होती. यानंतर १९७१ मध्ये त्यांनी ढाक्याची सीमा ओलांडली आणि आगारतळाच्या समोरील गंगासागर रेल्वे स्थानकाच्या भागात प्रवेश केला. या युद्धातील शौर्याकरिता सुभेदार अल्बर्ट एक्का यांना परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले, तर मेजर तारा यांना वीरचक्राने गौरविण्यात आले.पाकिस्तानी सैनिकांशी संवाद तुटल्यानंतर १२ सैनिकांनी शेख कुटुंबीयांना ओलीस ठेवले होते. पुढे आलात तर गोळ्या घातल्या जातील, असे सांगण्यात आले. त्यांच्याशी हिंदी आणि पंजाबी भाषेत संवाद साधत होतो. मात्र त्यांचा माझ्या शब्दावर विश्वास बसत नव्हता. शेवटी बरीच विनवणी करून त्यांना मनवण्यात यश आले. थोड्या वेळानेच तिथे भारतीय हेलिकॉप्टर्स दाखल झाले. आणि शेख कुटुंबीयांची सुटका झाल्याची आठवण तारा यांनी या वेळी सांगितली....मोदी यांना सांगितली शौर्यगाथामागील वर्षीच्या एप्रिलमध्ये शेख हसिना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्या वेळी तारा हे आभा या आपल्या पत्नीसमवेत आले होते. त्या वेळी शेख यांनी पहिल्यांदा मोदी यांना कर्नल तारा यांच्या युद्धाच्या वेळच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगितली.