पुणे : अनेकजणींनी कधीही साहसी मोहिम केलेली नव्हती. पण आता ७० ते ७५ फुटांचा कडा उतरायचा आणि चढायचा होता. त्यामुळे घाबरून चालणार नव्हते. हिंमतीने आणि न घाबरता कडा उतरून जवळपास ५० महिलांनी आम्ही हिरकणी असल्याचे दाखवून दिले. निमित्त होते महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या वेताळ टेकडीवरील रॅपलिंग आणि क्लाइंबिंगचे. टेकडीवरील खाणीतील कड्यावर हा थरारक खेळ बुधवारी सकाळी घेण्यात आला. यावेळी सह्याद्री अॅडव्हेंचर ग्रुपच्या वतीने आयोजन केले होते.
या साहसी खेळासाठी ग्रुपचे संस्थापक सुनील कुंजीर, अध्यक्ष मनोहर लोळगे, उपाध्यक्ष अजय काळे, सेक्रेटरी सुहास रांजणे, खजिनदार अभिजीत उभे, प्रशांत पिंपळनेरकर, निलेश मडके, हंबीरराव कुंजीर, भाग्यश्री कुंजीर, जयश्री रांजणे व इतर सभासद उपस्थित होते. सर्वांशी महिलांना रॅपलिंग व क्लाइंबिंग करण्यासाठी मदत केली. हा खेळ सर्व महिलांना मोफत आयोजित केला होता. महिलांनी 70 ते 75 फुटाचा कडा रॅपलिंग व क्लाइंबिंग केला. त्यात अकरा वर्षांच्या लहान मुलीदेखील होत्या. महिलांमधील साहस वाढावे आणि त्या सक्षम व्हाव्यात यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
यासाठी वन विभागाकडून परवानगी घेण्यात आली होती. सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी यासाठी मदत केली. कड्यावरून उतरताना योग्य ते संरक्षण साहित्य उपलब्ध केले होते. महिलांनी मनसोक्त होऊन या साहसी खेळाचा आनंद घेतल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष मनोहर लोळगे यांनी दिली.
''मी रॅपलिंग आणि क्लाइंबिंग करण्यासाठी खूप उत्सुक होते. या खेळाने मनातील भीती कुठल्या कुठे पळून जाते. सुरवातीला उतरताना भीती जाणवली पण नंतर खूप छान वाटलं. आपणही कडा चढू व उतरू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला. - प्रिया भोंडवे, रॅपलिंगमध्ये सहभागी महिला''
''महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी हा कार्यक्रम खास महिलादिनी घेतला. दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येतो. जेणेकरून महिलांना सन्मान म्हणून आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा म्हणून. आज वर्किंग दिवस होता, तरी देखील जवळपास ५० महिलांना या खेळाचा आनंद घेतला. - मनोहर लोळगे, अध्यक्ष, सह्याद्री अॅडव्हेंचर ग्रुप''