सध्या मूल्य व संस्कार लोप पावत चालले आहेत. शालेय शिक्षणामध्ये एकाच पठडीतले शिक्षण मिळत असून, नीतिमूल्ये व संस्कार मिळण्याची गरज आहे. शाळेत शिक्षण मिळतंय; पण विद्यार्थ्यांना घरातूनच खऱ्या अर्थाने नीतिमूल्ये व संस्कार मिळत असतात. म्हणून आज पुन्हा एकदा घर नावाची संस्कारशाळा अस्तित्वात येण्याची गरज आहे. त्यातून आपल्यातील भावी शास्त्रज्ञदेखील उदयास येतील, अशी अपेक्षा ‘जीएमआरटी’चे वरिष्ठ प्रशासकीय व वित्त अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी व्यक्त केली.आधुनिकतेच्या नावाखाली हल्लीच्या काळात पालकांकडून मुलांना संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव मिळत नसून, मुलांचे हट्ट पुरवले जात आहेत. यामुळे हल्लीच्या मुलांमध्ये संस्कार, नीतिमूल्ये, सामाजिक भान, कर्तव्य, स्वयंशिस्त व जबाबदारी या गोष्टी दुरापास्त वाटू लागल्या आहेत. आर्थिक मोल जपण्यापेक्षा नैतिक मूल्ये जपण्याची गरज आहे. मुलांनी कोणतीही गोष्ट ही आयती मिळवून त्यात आनंद शोधण्यापेक्षा तीच गोष्ट जर स्वत:च्या हिमतीवर आणि कष्टाने मिळवली तर त्यात त्यांना खरा आनंद मिळेल. समाजात आपण अनेक समस्या पाहतो. अनेक समस्या या मुला-मुलींवर योग्य संस्कार होत नसल्यामुळेच होत आहेत आणि आज घर नावाची संस्कारशाळा असे संस्कार देण्यात कमी पडत आहे. बदलती जीवनपद्धती, विभक्त कुटुंबव्यवस्था, आजी-आजोबांचा अनादर, योग्य व सुसंस्कारी संगतीचा अभाव, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अनियंत्रित अतिवापर, हिंसक मानसिकतेत वाढ, इतर अनेक प्रकारच्या बाबींचा उल्लेख या ठिकाणी करता येईल.यावर उपाय म्हणजे मला असे वाटते, की याची सुरुवात इयत्ता चौथी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर मूल्य व संस्कार यांची अत्यंत गरज आहे. यामध्ये सत्य, अहिंसा, स्वयंशिस्त, स्वावलंबन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. हेच शिक्षण पुढे ८ वीपासून पुढे महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सक्तीचे करणे आवश्यक आहे. यामध्ये चांगल्या वाहतुकीचे नियम व पालन, कचरा व्यवस्थापन, घरातील व गावातील कचऱ्याचे नियोजन, घरातील व गावातील आरोग्य व स्वच्छता, पाण्याचा वापर व काटकसर, वैज्ञानिक दृष्टिकोन व वैज्ञानिक विचार, वाचन व वैचारिक मंथन, निकोप चर्चा व प्रश्न सोडवणूक, अहिंसात्मक संभाषण, इतर विषय गंभीरपणे शैक्षणिक उपक्रमांतर्गत शिकवले जाणे गरजेचे आहे. इयत्ता ८ वीपासून पुढे करिअरविषयीसुद्धा एक विषय शिकवला जावा, जेणेकरून इयत्ता १० वी व १२ वी नंतर काय, याचा अभ्यास करून योग्य ते करिअरक्षेत्र निवडता येईल. त्यामध्येच पुढे शिक्षण घेऊन उत्तम व्यवसाय अथवा नोकरी करता येईल. याशिवाय मुलांवर चांगल्या संस्कारांसाठी त्यांना योग्य विचार देण्याची गरज निर्माण झाली आहे. लहान वयातच मुलांवर संस्कार होणे गरजेचे असल्याने पालकांनी याकडे दुर्लक्ष न करता मुलांच्या प्रत्येक आवडीनिवडीकडे लक्ष देणे, ही आता काळाची गरज आहे. मुलांच्या मनात विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्याची गरज आहे. आपण बाहेरच्या देशांचे गोडवे गातो; पण ते देश एवढे प्रगत का आहेत, याचा आपण कधी विचार करत नाही. विदेशात प्रत्येक घटक हा स्वयंशिस्तीला ध्येय मानून जीवन जगतो आणि त्यांचा स्वयंशिस्तीवर नितांत विश्वास आहे.बेशिस्त वागणाऱ्याला तेथे कठोर शिक्षा केली जाते. नीतिमूल्ये, संस्कार आणि स्वयंशिस्त या बाबी विद्यार्थ्यांच्या मनात रुजल्यानंतर हीच पिढी भारताला सुसंस्कारी आणि सुसंपन्न देश म्हणून घडवू शकेल.विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनावर या बाबी का बिंबवल्या पाहिजेत. कोणत्याही झाडाचे कलम हे मोठ्या झाडावर केले जात नाही तर ते लहान रोपांवरच कलम केले जाते. म्हणून लहान वयातच या मुलांना सुदृढ अशी वैचारिक दिशा दिल्यास ही पिढी आपल्या देशाचा एक आदर्श आणि जबाबदार नागरिक म्हणून उदयास येईल.
...आणि त्यातूनच भावी शास्त्रज्ञ उदयास येतील
By admin | Published: May 01, 2017 1:54 AM