स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेल्या आम्हा युवकांना ती रात्र म्हणजे स्वप्नपूर्ती हाेती. जुलमी ब्रिटिश सत्ता हद्दपार हाेऊन देश स्वतंत्र हाेणार हाेता. हा स्वातंत्र्य दिवस अविस्मरणीय व्हावा असाच हाेता. त्यातही आम्ही पाेर्तुगिजांच्या अधिपत्याखाली. त्यामुळे गाेव्यात स्वातंत्र्य दिवस साजरा करणे अवघड हाेते. तरीही आम्ही तरुणांनी माेठ्या काैशल्याने एका खादीच्या दुकानातून तिरंगा झेंडा मिळवला आणि स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अर्थात दि. १४ ऑगस्ट १९४७ राेजी रात्री १२ वाजता ध्वजवंदन करून जल्लोष केला. हा अनुभव आहे स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दीनानाथ आमोणकर यांचा. ‘लोकमत’शी बाेलताना त्यांनी स्वातंत्र्याचा पटच उलगडला.
ब्रिटिश राजवट उद्ध्वस्त करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो युवकांनी प्राणाची आहुती दिली. अनेकांनी कारावास भोगला. पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. अंगाचे सालटे निघाले तरी हार मानली नाही. हीच ताकद, ध्येयनिष्ठा आणि त्याग देशाचे बलस्थान ठरले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश हा देश सोडून मायदेशी निघून गेले. भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर हाच स्वातंत्र्याचा लढा देशांतर्गत पोर्तुगाल, निजाम राजवटीविरोधात सुरू झाला आणि अन्यायाच्या अंधाराला सूर्य उद्याचा पाहू दे..! या ध्येयाने तरुणांनी दिलेला लढा साकार झाला.
स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला गोव्यात घरोघरी तिरंगा ध्वज फडकवला गेला. नागरिकांनीही मोठ्या उत्साहात; पण पोर्तुगाल सरकारच्या भीतीने घरच्या घरी हा उत्सव साजरा केला. गोडधोड केले होते. दरम्यान, तिरंगा ध्वज आणायचा कसा आणि कुठून हा प्रश्न होता. पणजीत एक खादीचे दुकान होते, तेथून आम्ही तिरंगा ध्वज मिळवला आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. ते दिवस आठवले की आजही अंगावर शहारे येतात. एक ऊर्जा मिळते.
देशावर जुलमी राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजवटीविरोधात देशभर संतापाची लाट पसरली होती. महात्मा गांधींच्या नेतृत्वात सत्याग्रह सुरू होता. एकीकडे हिंसाचार, तर दुसरीकडे असहकार, सत्याग्रह असे चित्र होते. अनेक नेते मंडळी सभा, कार्यक्रमांमधून जनजागृती करीत होते. त्याच्या जोडीला वृत्तपत्रे होती. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घडामोड लोकांपर्यंत पोहोचत होती. मुंबई, पुण्यात जे सुरू होते ते वाचून, ऐकून आम्ही प्रभावित झालो होतो.माझा जन्म २९ जून १९२९ रोजी गोवा राज्यात पणजी येथे झाला. मला कळायला लागले तेव्हापासून गुलामगिरीचा प्रत्यय पावलोपावली येत होता. मी साधारणतः १४ वर्षांचा असताना आमच्या येथे दुकानावर येणारे वृत्तपत्र न चुकता वाचू लागलो. त्यातून प्रभावित होऊन मी देखील तत्कालीन लढ्यात उडी घेतली. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून सक्रिय झालो.
देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण आमचा भाग, पर्यायाने आम्ही पोर्तुगिजांच्या पारतंत्र्यातच होतो. स्वातंत्र्याचे महत्त्व आम्हाला कळू लागले होते. ते मिळवण्यासाठी आम्हा तरुणांचा लढा सुरू झाला. आमच्या या लढ्याला नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत होता. मला आठवतं, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘गोवा म्हणजे भारतमातेच्या गालावरची पुटकुळी आहे’ असे म्हणाले होते. येथील पोर्तुगिजांना तत्काळ हटविले जाईल, असेही त्यांनी सांगितले हाेते. मात्र, याच पोर्तुगिजांपासून गोवा मुक्त करण्यासाठी दीर्घ संघर्ष करावा लागला.
गोवा मुक्तीचा हा मुद्दा ना. ग. गोरे यांनी पंडित नेहरूंकडे आग्रहाने मांडला होता. याचसाठी आम्ही अनेक आंदोलने केली. सभा घेतल्या. विशेषकरून गोवा मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग घेता आला. याच सहभागामुळे २६ जानेवारी १९५५ ते २० ऑगस्ट १९५९ हा काळ आगवाद कारागृहात गेला. अखेर स्वातंत्र्य मिळाले आणि आमचा संघर्ष सार्थकी झाल्याचे समाधान वाटते. दरम्यान, लढा द्यायचा म्हणजे मार खावा लागणार ही मानसिक तयारी आम्ही केलेली. तसेच प्रचंड व्यायाम करून मार सहन करण्यासाठी शरीर मजबूत केले होते. त्यामुळे अनेक मार पडूनही आम्ही डगमगलो नाही. आज मागे वळून पाहताना अनेक प्रसंग डोळ्यासमोर चटकन येतात. राम मनोहर लोहिया, डॉ. पुंडलिक गायतोंडे, पिटर अल्वारिस, पुण्यातील सिंधू देशपांडे, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, अनुताई लिमये, शिरुभाऊ लिमये, गायक सुधीर फडके, आदींची साथ आणि नेतृत्व लाभले.
आजच्या एकूण राजकीय, सामाजिक स्थितीकडे पाहिल्यानंतर मनाला वेदना होतात. आम्ही सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्य मिळविले; पण आजच्या नेते मंडळीचे स्वार्थ, बोकाळलेला भ्रष्टाचार, महागाईचे चटके बसत असतानाही लढण्याचे बळ हरवून बसलेले नागरिक पाहवत नाही. आज एकीकडे लोकांमध्ये निर्माण झालेली स्वार्थी वृत्ती, आपल्याच राज्यकर्त्यांकडून नागरिकांची होणारी लूट आणि बोकाळलेला भ्रष्टाचार; तर दुसरीकडे शारीरिक कष्ट नाही की व्यायाम, योगा नाही. त्यामुळे सुस्तावलेली नवी पिढी पाहिली की मन अस्वस्थ होतं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुन्हा तीच ऊर्जा, ध्येयवाद समाजात येऊ दे हीच अपेक्षा आहे.
(शब्दांकन : उद्धव धुमाळे)