पुणे : स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी दिलेल्या अनेक स्थळांच्या नावात बदल करण्यात आला. आजही देशात अशा अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना ब्रिटिशांनी दिलेल्या नावानेच अद्यापही ओळखले जाते. त्यापैकी एक म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटे. या बेटांना शहीद आणि स्वराज्य या नावाने ओळखले जावे, अशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी व्यक्त केली होती. शासनाने त्या बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावे देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी क्रांतितीर्थ काला पानी-अंदमान या पुस्तकाचे लेखक मधुकर आडेलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अर्चना देसाई, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. भाई वैद्य, भाविका काळे आदी उपस्थित होते.आडेलकर म्हणाले, नेताजींची ही इच्छा आतापर्यंत राज्यकर्ते प्रत्यक्षात उतरवू शकले नाहीत. शिवाय सामान्य जनतेलाही आता हळूहळू नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विस्मरण होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या बेटांचे नेताजींच्या इच्छेप्रमाणे नामकरण केले, तर नेताजींच्या स्मृतींचा तो योग्य सन्मान ठरेल. आणि भारतीयांच्या मनात आपल्याच देशाच्या दूरवर असलेल्या भागांबद्दल तेथील समस्यांच्या जागरूकता निर्माण होईल. यासाठी प्रसिद्ध माध्यमांनीही पुढाकार घ्यावा आणि शासनदरबारी हा विषय लावून धरावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
अंदमान, निकोबार बेटाला शहीद आणि स्वराज्य नाव द्यावे : मधुकर आडेलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:09 PM
शासनाने अंदमान आणि निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावे देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी क्रांतितीर्थ काला पानी-अंदमान या पुस्तकाचे लेखक मधुकर आडेलकर यांनी केली.
ठळक मुद्देनेताजींची ही इच्छा आतापर्यंत राज्यकर्ते प्रत्यक्षात उतरवू शकले नाहीत : आडेलकर 'प्रसिद्ध माध्यमांनीही पुढाकार घ्यावा आणि शासनदरबारी हा विषय लावून धरावा'