लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘आंदोलनजीवी’ ही देशाच्या पंतप्रधानाने देशाच्या सर्वोच्च सभागृहातून या देशातील प्रत्येक आंदोलकाला व आंदोलनाला दिलेली शिवीच आहे, अशी टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक डॉ. गणेश देवी यांनी केली. देशातील आतापर्यंतच्या शेकडो आंदोलनांचा व त्या आंदोलनांमध्ये हुतात्मा झालेल्या अनेकांचा हा अपमान असल्याचे ते म्हणाले.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्र सेवा दल काय करणार, याची माहिती देण्यासाठी डॉ. देवी बुधवारी (दि. १०) पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. डॉ. देवी म्हणाले की, ‘आंदोलनजीवी’ हा शब्द अवमानजनक आहे. केंद्र सरकारने त्यांना विरोध असलेला विचार अस्तित्वातच ठेवायचा नाही या दिशेने वाटचाल सुरू केलेली दिसते आहे. त्यामुळेच आंदोलन दिल्लीत सलग तीन महिने सुरू असलेले आंदोलन संपवण्याचा प्रयत्न होत आहे.
भारताला आंदोलनाचा इतिहास आहे. पंतप्रधान ज्या सभागृहात उभे राहून बोलले ते सभागृहही आंदोलनातून मिळाले आहे हे ते विसरले. कोणत्याही आंदोलनात असंख्य लोक सहभागी असतात. दिल्लीतील आंदोलनही त्याला अपवाद नाही. हे आंदोलन एका राज्यातील शेतकऱ्यांचे आहे असे सरकार कितीही म्हणत असले तरी ते आता या देशाचेही राहिलेले नसून ते आंतरराष्ट्रीय होत आहे. त्यामुळेच पंतप्रधानपदासारख्या महत्त्वाच्या व मोठ्या पदावरील व्यक्तीने अशी अवमानजनक भाषा वापरली असे देवी म्हणाले.
राष्ट्र सेवा दलाचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे डॉ. देवी यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या सुरुवातीलाच कोल्हापूर येथून निघालेल्या पाठिंबा फेरीत सहभागी होतो, असे ते म्हणाले. आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि शेती कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील १० लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या जमा केल्या जाणार आहेत. दोन्ही राज्यांचे राज्यपाल व राष्ट्रपतींना त्या पाठवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.