पुणे - पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील अनसुटे येथे अंगणवाडीतील विद्यार्थ्याच्या जेवणात पिकावर मारण्याचे विषारी औषध टाकून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या प्रसंगावधानाने या चिमुरड्याचा जीव वाचला. ही घटना शुक्रवारी घडली. नेहमीप्रमाणे दुपारी एकला अंगणवाडीसेविका हिरा लष्करे व मदतनीस शोभा गायकवाड यांनी मुलांना मध्यान्ह भोजनासाठी वर्गात बसून मसालेभात दिला होता. मुलांनी भात खाण्यास सुरुवात केली होती. त्याच सुमारास सहादू धोंडिबा टेमगिरे हा त्याच्या लहान मुलीला घेऊन वर्गात आला. माझ्या मुलीलाही मसालेभात द्या, असे सांगितले. त्यानुसार मदतनीस गायकवाड यांनी त्या मुलीलाही मसालेभात खायला दिला. ही मुलगी भात खात असताना टेमगिरे यांनी तिला पाणी प्यायचे आहे, असे सांगून वर्गातील सार्थक चिंतामण मोरमारे (वय ४) याच्यापुढील पाण्याची बाटली घेतली. त्याच वेळी वर्गात गॅसगळतीसारखा उग्र वास येत असल्याचे अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना जाणवले. त्यांनी गॅस सिलिंडर तपासला. मात्र, वास गॅसचा नसून पिकांवर मारण्यासाठी वापरण्यात येणाºया विषारी औषधाचा असल्याचे जाणवल्याने त्यांनी प्रथम सार्थकसह सर्वांचे डबे तपासले. सार्थकच्या डब्यातील मसालेभात काळा पडला होता. ‘सार्थक, तुझ्या डब्यात हे कोणी टाकले,’ असे अंगणवाडीताईंनी विचारले असता, त्याने टेमगिरेकडे बोट दाखवले. याबाबत त्याला विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. टेमगिरेनेच सार्थकच्या डब्यात औषध टाकल्याचे लक्षात येताच अंगणवाडी कर्मचाºयांनी गावकºयांना बोलावले. गावकºयांनी जाब विचारताच उडवाउडवीची उत्तरे देत त्याने तेथून धूम ठोकली. या घटनेची तक्रार अंगणवाडीसेविका हिरा लष्करे यांनी वडगाव मावळ पोलिसांत दिली. त्यानुसार चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेमगिरेवर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यात विषारी औषध टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 10:38 PM