लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: अंगणवाडी सेविकांना कोरोनाविषयक सर्वेक्षण करायला सांगताना त्यांना कोणतीही सुरक्षा साधने दिली जात नाहीत, त्यातूनच एका सेविकेचा मृत्यू झाल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी सभेने केला आहे.
फ्रंटलाईन वर्कर, कोरोना योद्धे म्हणून प्रशासनाचा गौरव होत असताना त्यातही दुजाभाव केला जात असल्याची टीका सभेने केली. पतीनिधनानंतर पुण्यातील प्रेमनगर इथे अंगणवाडी ताई म्हणून काम करत असलेल्या सविता शिळीमकर कामावर असताना कोरोनाबाधित झाल्या. त्यांना पुण्यात बेड मिळाला नाही. भावाने भोर तालुक्यातील रुग्णालयात दाखल केले. १४ एप्रिलला त्यांचे निधन झाले. त्यांची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली. थोरल्या मुलीची मृत्युशी झुंज सुरू आहे.
सभेचे अध्यक्ष नितीन पवार म्हणाले,
साध्या कर्मचा-याचाही दर्जा नाही, तुटपुंजे मानधन तेही वेळेवर मिळत नाही, तरीही वरिष्ठांच्या जाचामुळे सर्व अंगणवाडी सेविका टेक होम रेशन वाटत आहेत, सर्वेक्षण करत आहेत, गृह भेटी देत आहेत. हे करताना त्यांना प्रशासनाच्या वतीने मास्क, ग्लोज, सॅनिटायजर, फेस शिल्ड आवश्यक तेथे पीपीई किट यापैकी काहीही दिले जात नाही व त्या कोरोनाची शिकार होत आहेत.
बाधीत झाल्यावर फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांना उपचाराची कसलीही व्यवस्था नाही, बेड उपलब्ध होत नाहीत. उपचाराच्या खर्चाची व्यवस्था नाही, विमा सुरक्षा कवच होते, पण मार्च २०२१ अखेर त्याची मुदत संपली तरीही प्रशासन ढिम्म आहे असे पवार यांनी सांगितले.
शिळीमकर एकट्याच नाहीत तर,
कोथरूड प्रकल्पातील एक अंगणवाडी सेविका व त्यांचे पती कोरोना बाधित झाले व स्वखर्चाने बरे झाले. मध्यवर्ती प्रकल्पातील एक सेविका पुण्यात बेड मिळत नाही म्हणून चिंचवड येथे उपचारासाठी दाखल व अत्यवस्थ आहेत. या सर्व गोष्टी संतापजनक आहेत. फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन फिल्डवर कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविकांना सुरक्षा साधने पुरवावीत, अशी मागणी सभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले.