बारामती : इंदापूर पंचायत समिती येथे गुरुवारी (दि. २) अंगणवाडी सेविकांनी ‘मोबाईल वापसी आंदोलन’ केले. पोषण अभियानांतर्गत शासनाने दिलेले व नंतर नादुरुस्त झालेले ४११ मोबाईल एकात्मिक महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाकडे परत दिले.
इंदापूर अंगणवाडी सेविका संघटनेच्या तालुकाध्यक्ष बकुळा शेंडे यांच्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियानांतर्गत सन २०१९ मध्ये अंगणवाडी सेविकांना शासनाने मोबाईल दिले होते. लाभार्थींचा सर्व तपशील त्यामध्ये भरायचा होता. तथापि, मोबाइलची क्षमता अपुरी असल्याने तपशील भरण्यात अडचणी येत होत्या. मोबाईलची वॉरंटी मे २०२१ मध्ये संपली. त्यानंतर बहुतांश मोबाईल बंद पडले. मोबाईल निकृष्ट असल्याने सतत नादुरुस्त होत आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी तीन ते आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. तो अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जात आहे. मोबाईलची क्षमता कमी असल्याने केंद्र शासनाने दिलेले पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन डाऊनलोड करता येत नाही. त्या ॲपवर माहिती भरण्यात यावी, अन्यथा अंगणवाडी सेविकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्पाधिकारऱ्यांकडून सांगण्यात येते आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यातील बिघडलेले व बंद पडलेले एक लाख शासकीय मोबाईल शासनाला परत करण्याचा इशारा दिला होता. त्याच्या अनुषंगाने आज येथे आंदोलन करण्यात आले.
०००००००००००००००००००
तालुक्यातील ४११ अंगणवाडी सेविकांनी आंदोलनास पाठिंबा दिला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकूण पंधरा विभागांतील प्रत्येकी २५ ते ३० अंगणवाडी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या शिष्टमंडळाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्पाधिकारी संदीप काळे यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलताना काळे यांनी मोबाईल परत घेण्याबाबत कार्यालयाकडे शासनाच्या सूचना आल्या नाहीत. आपल्या जबाबदारीवर मोबाईल जमा करावेत, असे त्यांनी सांगितल्यानंतर मोबाईल कार्यालयात जमा करण्यात आले.
इंदापूर येथे पोषण अभियानांतर्गत दिलेले नादुरुस्त मोबाईल अंगणवाडी सेविकांनी बालविकास प्रकल्प विभागाला माघारी केले.
०२०९२०२१-बारामती-०१