पुणे : अंगणवाडीतार्इंच्या निवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याच्या शासन निर्णयाविरोधात अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाठी वापसी मोर्चा काढण्यात आला. हा निर्णय मागे घेऊन अंगणवाडीतार्इंवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.राज्य शासनाच्या वय कमी करण्याच्या निर्णयामुळे हजारो अंगणवाडीतार्इंना घरी बसावे लागणार आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र या निर्णयाला अंगणवाडीतार्इंकडून विरोध होऊ लागला आहे. शुक्रवारी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. समाजकल्याण आयुक्तालयाच्या आवारातून या मोर्चाला सुरुवात झाली.ज्येष्ठ अंगणवाडीतार्इंनी मोर्चाचे नेतृत्व केले. या वेळी नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये लीला साळवे, सुजाता देशपांडे, छाया कपटकर, सुमन बनसोडे, रूपाली कांबळे आदी सेविका मदतनिसांनी आपल्या व्यथा मांडल्या. पवार म्हणाले, ‘‘अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवासमाप्तीचे वय केंद्राच्या धोरणानुसार ६५ असूनही राज्य शासनाने मानधनवाढीच्या शासकीय आदेशात सेवासमाप्तीचे वय ६५वरून ६० करण्याचा विषय लबाडीने घुसवला. त्यामुळे ६५ वयापर्यंत काम करण्याची शारीरिक, मानसिक तयारी असलेल्या कर्मचाºयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मानधनासाठी लढा दिल्यामुळेच १२५ पासून आत्ता कुठे सेविका ६,५०० पर्यंत आणि मदतनीस ५० पासून ३,५०० पर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांनाच आता निवृत्तीचे वय कमी केल्यामुळे मिळालेल्या मानधनवाढीचा लाभ न घेता घरी जावे लागणार आहे.’’।मागण्यांचे निवेदन‘बुढापे की लाठी वापस-लो काम दो, साठीनंतर निवृत्तीचा आदेश रद्द करा, देशात पासष्ट राज्यांत साठ- ये है दोहरी बात’ असे घोषणाफलक अंगणवाडीतार्इंनी हातात घेतले होते. तसेच, शासनाला परत द्यायच्या प्रतीकात्मक म्हातारपणाच्या कागदी लाठ्याही त्यांच्या हातात होत्या. त्यानंतर निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना म्हातारपणाची प्रतीकात्मक काठी परत देण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अंगणवाडीतार्इंचा लाठी वापसी मोर्चा, निवृत्तीचे वय कमी करण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:21 AM