आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी देहूफाटा परिसरातील पुणे - आळंदी रस्त्यावर दुतर्फा असलेल्या लॉजिंग व्यवसायामुळे देहविक्री करणाऱ्या महिलांची वर्दळ वाढल्याने त्याचा त्रास स्थानिक महिला व शालेय विद्यार्थिनींना होत आहे. वेश्या व्यवसायाशी संबंधित अनोळखी महिला व पुरुष थेट येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना विचारणा करून त्रास देत असल्याची घटना घडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी जाब विचारणाऱ्या स्थानिक महिलांना वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला धमकी देऊन गप्प बसा ! अशी धमकी देत आहेत. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून हे धंदे बंद करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी स्थानिकांनी देहूफाटा परिसरात रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदवला.
आळंदी देहूफाटा येथे वाढलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला स्थानिक भगिनीने जाब विचारला असता त्या देहविक्री करणाऱ्या महिलेने 'तुला कापून टाकीन' अशी धमकीची भाषा वापरली. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. याविरोधात रस्ता - रोको करून घटनेचा निषेध नोंदवला. घटनास्थळी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक महिला व स्थानिक तरुण आक्रमक असल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
देहविक्री करणाऱ्या वेश्या महिलांपासून होणारे त्रास, वारंवार घडत असलेल्या घटना याबद्दल स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. आगामी काळात एक ही वेश्याव्यवसाय करणारी महिला रस्त्यावर आढळणार नाही. अशी हमी दिल्यानंतरच कायदा सुव्यस्थेवर विश्वास ठेवत आंदोलनकर्त्यांना रस्ता - रोको आंदोलन थांबवले. मात्र यावर पोलिसांनी आवर घातला नाही तर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
आळंदी - देहूफाटा परिसरात १० मार्च २०१९ रोजी स्थानिक महिलांची छेडछाड झाल्याने स्थानिक नागरिकांनी टवाळखोरांसह वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना चोप दिला होता. त्यावेळेही स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली होती. यापार्श्वभूमीवर तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलांचे प्रश्न जाणून पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी संबंधित वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला व लॉजिंगबाबत अधिक दक्षता घेतली जाईल असे सांगितले होते. परंतु या घटनेला सव्वातीन वर्ष होऊनही देहूफाटा रस्त्यावरील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या त्रासापासून स्थानिक नागरिकांची सुटका झाली नाही.