पुणे : शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्यावर ॲन्जिओग्राफी झाली आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी बहिरट यांनी बारामतीत जाऊन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक त्रास झाल्यामुळे दत्ता बहिरट यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. बहिरट यांच्यावर ॲन्जिओग्राफी झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दोन दिवसांनंतर ते प्रचारात सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे अवघ्या ५ हजारांच्या फरकाने निवडून आले होते. त्यावेळी दत्ता बहिरट २ नंबरवर होते. आगामी विधानसभेतही चुरशीची लढत होणार असल्याचे दिसते आहे. अपक्ष उमेदवार मनीष आनंदही या लढतीत आहेत. परंतु त्यांच्या लढण्याचा निवडणुकीवर परिणाम होईल का? याबाबत कार्यकर्त्यानांच शंका आहे.