नारायणपूर : पुरंदरचे अंजीर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुरंदर हा तालुका जरी दुष्काळी असला तरी पुरंदरमधील काही गावांमधून थोड्या पाण्याचे योग्य नियोजन करून कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्यात हुशार आहेत. फळबागेच्याबाबतीत तेच आहे, कारण कोणत्या हंगामात काय पाहिजे, हे शेतकरी हेरून तसे उत्पादन घेत असतात. अंजिराचे दोन बहार असतात खट्टा बहार आणि मिठा बहार. सध्या चालू आहे मिठा बहार. कमी पाण्यावर याचे नियोजन करून हा बहार घेतला जातो. सोनोरी (ता. पुरंदर) येथे अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या ठिकाणी जास्तीत जास्त फळबागा आहेत. जास्तीत जास्त पाणी असेल तेच शेतकरी हा बहार घेतात. अंजिराचा गाव म्हणून सोनोरी गावाची ओळख आहे. प्रत्येक झाडाची उंची १० ते १५ फुटांपर्यंत आहे. पाण्याबरोबर खतांची मात्रा दिली जात असते. शेणखताच्या फक्त वापराने पिकावर चांगला परिणाम होत असतो. साधारण एका झाडावर सरासरी १५० किलो उत्पादन मिळते. साधारण दोन प्रतीत फळांची प्रतवारी करून पुण्याच्या बाजारपेठेत नेली जातात. किमान १० किलो वजनाची एक पाटी असते. आज एक नंबर मालाला १०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. बाग चालू झाल्यावर मजुरीवरचा जास्त खर्च होत असतो. मागील वर्षी रोगामुळे खूप मोठे नुकसान झाले होते. मात्र यावर्षी किमान १० लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सुनील शिंदे यांनी सांगितले.
अंजिराचा ‘मिठा बहार’ जोरात
By admin | Published: February 20, 2016 12:58 AM