पुणे : पाटबंधारे विभागाने महापालिकेचे बंद केलेले तीनही पंप सुरु केले असून, पुरेसा पाणी साठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतु त्यानंतर देखील शहरा-या अनेक भागात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. यामध्ये वडगावशेरी, लोहगाव, खांदवेनगर भागासह शहारातील अनेक भागात कमी दाबाने पाणी येणे, एक तासा ऐवजी अर्धा तासच पाणी मिळणे, चार घरांना पाणी मिळाले तर पाच घरांना पाणीच नाही असे अनेक प्रकार मंगळवार- बुधवारी देखील झाले. यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी बुधवारी पुन्हा महापालिकेवर मोर्चा काढला व प्रशासनाला जाब विचारला. यावर दस-याच्या मुहूर्तावर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट केले.
गेल्या अनेक दिवसांपासून ढासळलेल्या पाणीपुरवठा नियोजनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी थेट महानगरपालिकेवरच मोर्चा काढला. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या लोहगाव आणि खांदवे नगर या भागात पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. त्याच प्रमाणे वडगाव शेरी ते इतर भागात फक्त एक ते दीड तास पाणी येते. कित्येक वेळा स्थानिक नगरसेवक यांच्याकडून आंदोलन करून देखील परिस्थिती बदलत नसल्यामुळे माजी आमदार बापू पठारे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोर्चा काढण्यात आला. विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुं यांनी यावेळी विद्युत पंप पूर्ण क्षमतेने चालवण्याचे आश्वासन दिले, त्याच प्रमाणे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी येत्या काळामध्ये हा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने सुरळीत केला जाईल व किमान प्रत्येक भागासाठी दोन तासांपेक्षा जास्त पाणी पुरवण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. यावेळी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, संजीला पठारे, सुमन पठारे, महेंद्र पठारे, उषा कळमकर, रमेश आढाव, राजेंद्र खांदवे, संदीप मोझे, नाना नलावडे, सुरेश शेजवळ, महेश तांबे, सोमनाथ साबळे, अशोक खांदवे, बंडू खांदवे हे या आंदोलनात सहभागी होते.