वाघोली : भरधाव डंपरच्या धडकेने दोन विद्यार्थ्यांना धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना वाघोली येथे सोयरीक मंगल कार्यालयासमोर दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. अपघातानंतर वातावरण तणावपूर्ण झाल्याने संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. या वेळी पुणे-नगर महामार्गावर रात्री उशिरापर्यंत वाहातूककोंडी झाली होती. गणेश बापूसाहेब हरपळे (रा. आव्हाळवाडी) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, मंथन चंद्रशेखर धुमाळ (रा. उबाळेनगर) हा गंभीर जखमी झाला आहे.पुणे-नगर महामार्गावर दुचाकीवरून गणेश हरपळे व मंथन धुमाळ जात असताना सोयरीक मंगल कार्यालयासमोरील चौकामध्ये भरधाव डंपरने दोघांनाही जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गणेशचा जागीच मृत्यू झाला, तर मंथन गंभीर जखमी झाला होता. त्याला तरुणांनी तत्काळ रुग्णालयात हलविले. अपघातानंतर डंपरचा चालक फरार झाला. अपघाताची बातमी वाघोली, आव्हाळवाडी परिसरामध्ये समजल्यानंतर तरुणांचा मोठा घोळका या ठिकाणी जमा झाला. तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर डंपरची दगडफेक करून तोडफोड केली. संतप्त जमावाने डंपरच्या केबिनमध्ये पेट्रोल ओतून पेटवून दिले. अर्धा ते पाऊण तास डंपरचा पुढील भाग जळत होता. ग्रामस्थ आणि पोलिसांनी पाण्याच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. पुण्याहून शिरूरकडे जाणारी एक बाजू बंद करण्यात आल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत पोलीस वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. गणेश हरपळे हा सातव विद्यालयात १२वी टेक्निकलमध्ये शिकत होता.
संतप्त जमावाने पेटवला डंपर
By admin | Published: July 25, 2015 4:25 AM