शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून, विद्युतपंपाच्या विजेचे सलग १६ तासांहून अधिक काळ भारनियमन केले जात आहे. तसेच, भारनियमनाव्यतिरिक्त उपलब्ध असलेली वीजही वारंवार खंडित होत असल्याने विजेचा विषय शेतकर्यांच्या दृष्टीने डोकेदुखीचा बनू लागला आहे. याविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकर्यांनी भोसे येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहूळ, कोयाळी भानोबाची, मोहितेवाडी, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव घेनंद, भोसे, नवीनगाव आदी गावांमध्ये मागील सात-आठ महिन्यांपासून विद्युत पंपाच्या विजेचे दिवसा १६ तास भारनियमन सुरू आहे. भारनियमन तसेच विजेच्या लपंडावाला बळी पडणारी ही गावे बारमाही पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असून सलग होणाºया भारनियमनामुळे या गावांमधील रब्बी हंगामातील कांद्याच्या लागवडी तसेच अन्य पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोसे येथे शुक्रवारी (दि. ७) शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी विजेच्या समस्या निवेदनाद्वारे मांडण्यासाठी गेले असता, कार्यालयातील अधिकार्यांनी पळ काढला. निवेदन स्वीकारण्याचे धाडस केले नाही. अखेर शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेऊन कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, रोहिदास दौंडकर, सुभाष पवळे, उपसरपंच एकनाथ आवटे, रवींद्र आवटे, संदीप पोटवडे, वस्ताज दौंडकर, कांताराम लोणारी, बबनराव दौंडकर, दत्ता सोनवणे, कैलास आरगडे, रामदास आवटे आदींसह अन्य आंदोलक शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्षअठरा तासांचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात महावितरण कंपनीकडे शेतकरी वारंवार विनवणी करीत आहेत. मात्र, कंपनीकडून पूर्ण क्षमतेने वीज देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामातील कांदालागवडीचे आव्हान शेतकºयांसमोर उभे राहिले आहे.
खेडच्या पूर्व भागात सकाळी ६ ते रात्री ११ या काळात भारनियमन केले जात असल्याने शेतकर्यांना रात्रीचा दिवस करून शेतसिंचन करावे लागत आहे. शेलगाव येथील चंद्रकांत ठकूजी आवटे (वय ५५) हे पहाटेच्या वेळी शेतात सिंचनासाठी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक देऊन गंभीर जखमी केले.
महावितरण कंपनीच्या दुपट्टी धोरणामुळे शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर वीजबिल भरूनही शेतकºयांना हक्काची वीज मिळत नसेल, तर हा अन्याय आहे. राज्यात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून विद्युत पंपासाठी रात्रीची वीज देणे, हे कितपत योग्य आहे.- दिलीप मोहिते-पाटील, माजी आमदार, खेड
नित्याच्या १६ तासांच्या भारनियमनामुळे रब्बी हंगामातील पिकांचे सिंचन करता येत नाही. तर, कांदालागवडीही एक आव्हान बनत चालले आहे. दिवसा वीज नाही म्हणून धोका पत्करून रात्रीचे शेतसिंचन करावे लागत आहे. विजेचा तिढा महावितरण कंपनीनी तत्काळ सोडविला पाहिजे. - एकनाथ आवटे, उपसरपंच, शेलगाव
मागील दोन-तीन महिन्यांपासून विजेचा प्रश्न अतिशय बिकट होऊ लागला आहे. महावितरण कंपनीला याबाबत निवेदन देण्यासाठी गेलो असता विभागीय वीज कार्यालयांमध्ये अधिकारीही हजर नव्हते. परिणामी, आम्हाला कार्यालयाला टाळे ठोकावे लागले.- बाळासाहेब दौंडकर, अध्यक्ष, शेतकरी संघटना खेड