बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेली सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी प्रकरण असो किंवा जय श्री राम म्हणत अयोध्येतील राम मंदिराला दिलेल्या शुभेच्छा यानंतर राजकीय धुराळा उडाला होता. त्यावरून ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ अपरिपक्व असून नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचे सांगत पार्थ यांना फटकारले होते.यावर राजकीय क्षेत्रात बुधवारचा दिवस अनेक तर्क वितर्कांसह गाजला गेला.भाजपच्या नेत्यांनी तर पार्थ लांबी रेस का घोडा असल्याचे म्हणत त्यांचे कौतुकही केले होते. मात्र या उद्भवलेल्या परिस्थितीवर बारामतीतराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त झाले. या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समवेतचे पार्थ पवार यांचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत पवार कुटुंब एकसंध असल्याचा संदेश दिला.
विरोधकांच्या पिढ्यांपिढ्या बरबाद होतील, पण त्यांना पवार घराण्याचे राजकारण कधीच समजणार नाही. पवार साहेबांच्या बोलण्याचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पार्थ पवार यांच्यासमवेत फोटो पोस्ट केलेला फोटो पुरेसा आहे असल्याचे देखील नमूद करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विसरले नाहीत.
२०१९ लोकसभेच्या वेळी पार्थ पवार यांची भाजपने टर उडवली. भरभूर ट्रोल केले. तेच भाजपवाले आता पार्थपवारांचे गुणगान करुन त्यांच्यावर लावलेले दाग धुवून काढत आहेत. त्यांच्याकडून चकाचक कपडे धुवून घेण्यात पवारसाहेब पटाईत आहेत. त्यावेळी पार्थ पवारांना ट्रोल करणारे लोकं आता पार्थ पवार जिंदाबादचा नारा देत आहे असे म्हणत हाच आहे.'पवार पॅटर्न' असा टोला देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लगावला आहे. तसेच ‘पवारसाहेब’ जे बोलतात त्याच्या नेहमी उलटे असते. असे विरोधक म्हणतात,असे म्हणणारे विरोधक आज त्यांच्या ‘स्टेटमेंट’चा अर्थ तसाच उलटा आहे. हे सांगत आहेत. असा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सोशल मिडियावर पोस्ट करीत प्रतिटोला लगावला आहे.-------------------