लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रायझिंग स्टार स्पोर्ट्सतर्फे आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिभावान खेळाडू अनीहा डिसुझा हिने रविवारी दुहेरी मुकुट पटकावला. साई बगाटे, रजत कदम, आदर्श गोपाळ, उज्वला गायकवाड, कृपाल देशपांडे, दीपेश अभ्यंकर यांनीही आपापल्या गटांमध्ये विजेतेपद पटकावले.पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने रहाटणी येथील नखाते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. सब ज्युनिअर (१५ वर्षांखालील) गटात झालेल्या मुलींच्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अनीहाने अव्वल मानांकित मृण्मयी रायखेलकर हिचा ३-०ने सहज पाडाव करीत विजेतेपद आपल्या नावे केले. तिने ही लढत ११-८, ११-७, ११-७ने जिंकली. ज्युनिअर गटात (१८ वर्षांखालील) मुलींच्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अनीहाने अव्वल मानांकित सलोनी शाहचा ११-७, १२-१०, ११-७, ११-४ने पराभव करून दुहेरी मुकुट प्राप्त केला. अनीहा ही एसपीएन इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये शिकत असून शारदा स्पोर्ट्स सेंटरमध्ये दीप्ती चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.१५ वर्षांखालील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अनय कोवेलामुदी याला ११-७, ११-६, ११-७ने नमवून चौथ्या मानांकित साई बगाटने बाजी मारली. १८ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित रजत कदम विजेता ठरला. अंतिम फेरीत त्याने दुसऱ्या मानांकित रोहन खिंवसरा याच्यावर ५-११, १०-१२, ११-६, ११-९, ११-६, ११-९ने मात केली. दुसऱ्या मानांकित साई बाकरेला ११-८, ११-६, १२-१०, १२-१०ने रोखत चौथ्या मानांकित उज्वला गायकवाडने महिला एकेरीचे विजेतेपद साकारले. पुरूष एकेरीत सातव्या मानांकित कृपाल देशपांडेने शानदार कामगिरी करीत बाजी मारली. त्याने अंतिम फेरीत अव्वल मानांकित वैभव दहीभाते याला ११-९, ११-८, ११-५, ११-१३, ४-११, ११-८ने पराभवाचा हादरा दिला.
जिल्हा टेबल टेनिसमध्ये अनीहाला दुहेरी मुकुट
By admin | Published: July 17, 2017 4:18 AM