पुणे : विभागीय आयुक्तालयातील लाचखोर आयएएस अधिकारी व अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड सीबीआयच्या जाळ्यात अडकल्यानंतर आता त्याच्यामागे अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याने रामोड याला सीबीआयने अटक केली. त्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत सहा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. त्याशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रेही हस्तगत केली होती. याच चौकशी दरम्यान त्याच्या पत्नीच्या नावावर ४७ लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती सीबीआयला मिळाली.
या प्रकरणातील चौकशीसाठी त्याच्या निलंबनाची आवश्यकता असल्याची शिफारस सीबीआयने विभागीय आयुक्त सौरभ राव यांना केली होती. त्यानुसार, विभागीय आयुक्तालयाने रामोड याच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावावर अद्याप निर्णय बाकी आहे.
रामोड याच्याकडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात अपील करण्याची प्रकरणे येत होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रामोड अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असताना त्याने अनेक महसुली प्रकरणांबाबत निर्णय घेतले. ही संख्या सुमारे ३७०च्या घरात असल्याचे बोलले जात आहे.
महसुली प्रकरणांच्या सुनावण्या होत असल्याने अनेक प्रकरणेही प्रलंबित आहेत. त्यात आठ लाखांची लाच घेतल्याने सीबीआय पाठोपाठ आता ईडीपर्यंत रामोड यांच्या कारनाम्याची माहिती पोहोचली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सीबीआय पाठोपाठ रामोड यांच्यावर ईडीची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी वक्फची जमीन इतरांच्या नावावर करून देण्याचे प्रकरणही चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे रामोड याचे पाय आणखी खोलात गेल्याचे बोलले जात आहे.