लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच घेत असल्याचे सीबीआयने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याने तक्रारदार वकिलाला मी १ कोटी वाढविले तर १० लाख रुपये मला द्यावे लागतील, असे सांगितल्याचे सीबीआयने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट झाले. रामोड याला शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.
राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यासाठी लवादचे प्रमुख म्हणून काम करणारा डॉ. अनिल रामोड याला ८ लाखांची लाच घेताना शुक्रवारी अटक केली.
लाचखोर अधिकाऱ्याच्या निर्णयाची होणार चौकशी
भूसंपादन प्रकरणात वाढीव मोबदला देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेला अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याने गेल्या काही दिवसांमध्ये लवाद म्हणून वाढीव मोबदला मंजूर केलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, यासंदर्भात विभागीय आयुक्तालयाकडून अहवाल तयार करण्यात येईल. तो राज्य शासनाकडे पाठविला जाईल. राज्य शासन त्यावर योग्य निर्णय घेईल.
डॉ. अनिल रामोड याला शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयच्या वतीने न्यायालयात सांगितले की, रामोड याने भूसंपादनाचा वाढीव मोबदल्याची रक्कम एक कोटी २३ लाख १७ हजार ३२० रुपये निश्चित केली होती. त्यासाठी त्याला आठ लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. रामोड याच्याकडे सापडलेली रक्कम मोठी आहे. त्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, त्याने काेणा-कोणाकडून लाच घेतली आहे, याचा तपास करायचा आहे.
रामोड याची आणखी काही मालमत्ता आहे का, आणखी कोठे रक्कम ठेवली आहे का याचा शोध घ्यायचा आहे. तक्रारदार आणि आरोपी रामोड यांच्यात टेलिफोनवरील संभाषण रेकाॅर्ड करण्यात आले आहे. आरोपीच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे. त्यासाठी पाच दिवसांची कोठडी देण्याची विनंती वकिलांनी केली. रामोड याच्या वतीने ॲड. सुधीर शहा यांनी बाजू मांडली. न्यायालयाने १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी मंजूर केली.
- रामोड हा दोन वर्षांपासून अप्पर विभागीय आयुक्त म्हणून काम करत आहे.
- पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील राष्ट्रीय महामार्गाची कामे जोरात सुरू आहेत. त्याच्या लवादचे काम पाहताना त्याने आजवर वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेतला. त्या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.