पुणे : जूना बाजार येथील चाैकात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमींच्या कुटुंबीयांना रेल्वेत नाेकरी देण्याची विनंती खासदार अनिल शिराेळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गाेयल यांना केली अाहे. शिराेळे यांनी पत्र लिहून ही विनंती केली अाहे.
पाच अाॅक्टाेबर राेजी पुण्यातील जुना बाजार येथील चाैकात रेल्वेच्या हद्दीतील हाेर्डिंग काढताना झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेला हाेता. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले हाेते. या अपघातामुळे अनेकांची कुटुंबे वाऱ्यावर पडली. अनेकांच्या कुटुंबाचा अाधार हरवला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना रेल्वेत नाेकरी देण्याची विनंती शिराेळे यांनी केली अाहे.
याविषयी अधिक माहिती देताना खासदार अनिल शिरोळे म्हणाले की, पुण्यात मागच्या आठवड्यात झालेली ही घटना दु:खद, दुर्दैवी आणि चीड आणणारी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या आधी रेल्वे प्रशासनाने घटनेतील मृत व्यक्तींबरोबरच गंभीर व किरकोळ जखमींना मदतीचा हात पुढे केला आहे. याबरोबरच या घटनेसाठी जबाबदार दोषींवर देखील कारवाई होत आहे. मात्र हे पुरेसे नाही. कारण या दुर्घटनेत हकनाक बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांचे काय यावर आता विचार करायला हवा. हेच लक्षात घेत या घटनेतील मृत व्यक्तींच्या व गंभीर जखमी व्यक्तींच्या कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वेने आपल्या सेवेत सामावून घ्यावे व त्या कुटुंबियांना मदत करावी अशी विनंती मी स्वत: रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना केली आहे, सदर विनंतीचा विचार पियुष गोयलजी करतील असा विश्वास असल्याचेही ते यावेळी म्हणाले.