दुधाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी
शेतकऱ्यांनी निवडला नाइलाजाने पर्याय
(रविकिरण सासवडे)
खर्च परवडत नसल्याने निर्णय : पशुधनाच्या आयुष्यमानावर होतोय परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : दिवसेंदिवस वाढत जाणारा उत्पादन खर्च आणि दुधाला मिळणारा प्रतिलिटर भाव यामुळे दूधउत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पशुखाद्याचे दर परवडत नसल्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी आहारामध्ये जनावरांना अल्कोहोलचा चोथा (बार्ली) खाऊ घालत आहेत. परिणामी, दुधाळ जनावरांचे आयुष्यमान घटत असून बार्ली खाणाऱ्या जनावरांचे दूध देखील मानवी शरीरासाठी अपायकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बारामती-इंदापूरच्या बागायतीसह जिरायती पट्ट्यामध्ये दुग्धव्यावसाय मोठ्याप्रमाणात केला जातो. सध्या ३.५ फॅट ८.५ एसएनएफ असणाऱ्या दुधाला २३ ते २४ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. तर, ५० किलो पशुखाद्याची एक पिशवी १ हजार ४०० रुपयांना मिळते. एक किलो पशुखाद्यासाठी २८ रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात. ज्या डिसलेरी प्रकल्पामध्ये यामध्ये सडलेले गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती केली जाते. असे प्रकल्प वितरक नेमूण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बार्ली पाठवतात. ८ ते ९ रुपये किलो दराने मिळणारी बार्ली जनावरांना खाऊ घातली जाते.
१९ जुन २०१७ रोजी तत्कालीन भाजप सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला २७ रुपये प्रतिलिटर दर ठरविला होता. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर ११ सप्टेंबर २०१८ रोजी तत्कालीन राज्य सरकाने २५ रुपये दूधदराचा अध्यादेश काढला. दरम्यान, निलंगेकर समितीच्या निर्देशाप्रमाणे २०१८-१९ मध्ये जिल्हा दूध व्यावसाय विकास कार्यालयाच्या वतीने दूध दराचे गणित मांडले होते. त्याप्रमाणे गाईच्या प्रतिलिटर दुधाला ४१.७७ पैसे उत्पादन खर्च तर म्हशीच्या प्रतिलिटर दुधाला ७४ रुपये ५५ पैसे उत्पादन खर्च होतो. भेसळयुक्त दूध बाजारात येत असल्याने गुणवत्तापूर्ण दुधाला दर मिळत नाही. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे दुग्धविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. तालुक्यातील दूधउत्पादकाला जर दुग्ध विकास राज्यमंत्री म्हणून भरणे न्याय देऊ शकत नसलतील, तर राज्यातील दूध उत्पादकला ते काय न्याय देणार, असा सवालही शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
कोट
कमी दूध दरामुळे सध्या दुग्धव्यावसाय बार्लीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला जर उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळाला तर शेतकरी देखील जनावरांना अपायकारक ठरणारी बार्ली खाऊ घालणार नाही. शहरवासीयांनी देखील दुधाला योग्य दर दिला पाहिजे.
- पांडुरंग रायते, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, पुणे
-----------------------------
बार्ली जनावरांच्या खाण्यामध्ये १० टक्क्यांच्या पुढे गेल्यास जनावरांच्या यकृतावर परिणाम होतो. बुरशीयुक्त बार्ली खाऊन काही जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे. बार्ली जनवारांसाठी अपायकारक आहे.
- शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
सध्या दूधव्यावसाय मोठ्या अडचणीत आहे. आम्ही कधीही जनावरांना बार्ली खाऊ घातली नाही. मात्र पशुखाद्य परवडत नसल्याने नाईलाजाने जनावरांना बार्ली खाऊ घालावी लागत आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता दुधाला ४० रूपये प्रतिलिटर दर हवा आहे. माझे रोजचे ६०० लिटर दूध उत्पादित होते. मात्र मजुरांचा खर्च, चारा, औषधोपचार, वीज, इंधन खर्च याचा विचार करता मला रोज ७ ते ८ हजार रुपयांचा तोटा होत आहे.
- नितीन माने, दूध व्यावसायिक,( कुरवली, ता. इंदापूर)